घोडबंदर रस्ता ४० मीटर रुंद झाल्यानंतर त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या परिसरातील विकासालाही गती मिळाली. वर पाहताच मान दुखेल अशा भव्यदिव्य आणि उंचच उंच इमारती शहराच्या कानाकोपऱ्यातून दिसू लागल्या. मानपाडा, आझादनगर, वाघबीळ, कासारवडवली आदी परिसरांत ही भव्यता शोभून दिसते. या घोडबंदर रस्त्यावरील उजवी बाजू तशी विकासात्मकदृष्टाही ताकदीची ठरली आहे. बाळकूम, कोलशेत, मनोरमा नगर, ढोकाळी आदी औद्योगिक भागांतही निवासी विकासाची पाळेमुळे रोवली गेली आहेत. मनोरमा नगर येथील न्यू रचना पार्क हे निवासी संकुलही त्यामधील एक म्हणावे लागेल. या निवासी संकुलात बहुभाषिक लोकवस्ती असली तरी एकात्मतेची ‘रचना’ येथे साकारली गेली आहे आणि आजतागायत ती येथे टिकून असल्याचे दिसते.
ठाणे रेल्वे स्थानकापासून साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मनोरमा नगरात २२ वर्षांपूर्वी नागरी सुविधांची दैना होती. असे असतानाही विकासकांनी येथे आपले पाय रोवले आणि भव्य इमारती उभ्या केल्या. काहींनी आपल्या परीने सुविधा दिल्या, तर काहींनी सुविधांचे स्वप्नरंजन केले. काहींनी सरकारी नियम धाब्यावर बसवून इमारती उभारल्याने त्यात राहणाऱ्या रहिवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. मनोरमा नगरमधील न्यू रचना पार्कचीही याच काळात उभारण्यात आले.
मनोरमा नगर परिसरात २२ वर्षांपूर्वी भूमिपुत्रांची वस्ती होती. काही ठिकाणी ती आजही आहे. ठाणे महापालिकेची स्टेशनपासून सुटणारी मनोरमा नगर बस ज्या शेवटच्या थांब्यावर थांबते, त्या थांब्याला लागूनच न्यू रचना पार्क हे निवासी संकुल आहे. सुमारे पावणेतीन एकर जागेत या संकुलाची उभारणी नागराज मेघराज जैन या विकासकाने केली आहे. त्या वेळी एस.टी. हेच वाहतुकीचे साधन होते. थोडय़ा थोडय़ा अंतरावर घरांची रचना होती. सुविधांची दैना असतानाही विकासकाने बांधकामाचा पाया रोवला आणि तळ अधिक तीन मजल्यांच्या सात इमारती आणि तळ अधिक सात मजल्यांच्या दोन अशा नऊ इमारती उभ्या केल्या. मनोरमा नगर परिसरातील सर्वात प्रथम उभारला गेलेला गृहनिर्माण प्रकल्प म्हणून त्याकडे पाहिले जाते. न्यू रचना पार्कने येथे मुहूर्तमेढ साधल्यानंतर त्याच्यापाठोपाठ आज अनेक भव्य गृहप्रकल्प येथे उभे राहिले. अद्याप ही प्रक्रिया सुरू आहे.
सुविधा समाधानकारक
न्यू रचना पार्क सुमारे पावणेतीन एकरमध्ये वसले आहे. संकुलात दोन उद्याने आहेत. त्यातील एक मुलांच्या खेळण्यासाठी आहे, तर दुसऱ्या उद्यानाचा लाभ सर्व सभासद घेतात, अशी माहिती अभिषेक कुलकर्णी यांनी दिली. वाहनतळासाठीही मोठय़ा प्रमाणात मोकळी जागा आहे. सोसायटीला एक कार्यालय देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संकुलाला दोन प्रवेशद्वारे आहेत. सीसीटीव्हीची व्यवस्था तसेच सुरक्षारक्षकही दिवसरात्र तैनात असतात. अग्निशमन यंत्रणेची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. तसेच संकुलात पाइपलाइन गॅसची सुविधाही आहे. संकुलात एक विहीर असून तिचे पाणी येथील झाडांसाठी वापरले जाते. त्याचप्रमाणे दोन कूपनलिकाही येथे खोदण्यात आल्या आहेत. त्याचे पाणी भांडी, कपडे धुण्यासाठी तसेच शौचालय, आंघोळीसाठीही वापरले जाते. पिण्याच्या पाण्याची २४ तास व्यवस्था आहे. संकुलातील काही जागा पोलीस चौकीसाठी देण्यात आली आहे. मनोरमा नगर पोलीस चौकी म्हणून ती ओळखली जाते. चौकी असल्याने त्याच्या धाकापायी येथे कोणतेही अनुचित वा गुन्हेगारीचे प्रकार होत नाहीत. गेल्या २२ वर्षांपासून संकुलात तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे येथील रहिवाशी सांगतात. संकुलातच २५ दुकाने आहेत. त्यात येथे राहणाऱ्या एका डॉक्टराचा वैद्यकीय दवाखानाही आहे. या दुकानातून आवश्यक त्या वस्तूंची पूर्तता होत असते, तर अवेळी उद्भवणाऱ्या आरोग्याबाबत काही समस्या असतील, तर डॉक्टर रहिवाशी दूरध्वनी करताच सेवेला हजर असतात. हीच मदतीची वृत्ती येथे राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशामध्ये आहे. संकुलाला लागूनच शनिवारी आठवडय़ाचा बाजार भरत असतो. त्यामुळे स्वस्तात काही पाहिजे असेल तर येथे ते हमखास मिळते, असे येथील रहिवाशी सांगतात. आर मॉल, बिग बाजार, कलादालन, काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, नाना-नानी पार्क, कोलशेत रोड असलेल्या वृक्षवाटिका, ज्युपीटर, मेट्रोसारखी रुग्णालये, तसेच गुणवत्ताकारक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थाही येथे आहेत. वाहतूक व्यवस्थाही चांगली आहे. संकुलापासूनच ठाणे महानगरपालिकेची बससेवा स्टेशनपर्यंत आहे. याशिवाय शेअर रिक्षांचा पर्यायसुद्धा आहे.
कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मता
वर्षभरात येणारे सर्व सण-उत्सव येथे साजरे होत असतात. या उत्सवातून बहुभाषिकांमधील राष्ट्रीय एकात्मता येथे प्रकर्षांने जाणवते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, होळी, दहीहंडी, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आदी विविध सण साजरे होत असतात. रक्तदानासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम संकुलात राबविले जातात.
नऊ इमारती आणि एकच सोसायटी
साधारणपणे कोणत्याही भव्य निवासी संकुलात दोन ते तीन इमारतींची एक सोसायटी आणि त्या सोसायटींची तयार केलेली एक फेडरेशन पाहायला मिळते; परंतु न्यू रचना पार्कमध्ये नऊ इमारती असूनही कोणतेही विभाजन न करता त्यांची एकच सोसायटी तयार करण्यात आली आहे. २१४ सदनिका आणि २५ दुकाने या संकुलात आहेत. विशेष म्हणजे या संकुलात मराठी, बंगाली, हिंदी, गुजराती, तामीळ आदी विविध भाषिक राहत असून सर्व मध्यमवर्गीय आहेत आणि त्यांच्यात कोणतेही वाद नाहीत. राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन येथे वर्षभरात होणाऱ्या कार्यक्रमातून पाहावयास मिळते, अशी माहिती सचिव दिलीप ठोंबरे यांनी दिली.
रस्तारुंदीकरणाची आवश्यकता
२२ वर्षांपूर्वीचा असलेला मोकळा परिसर आता पूर्णत: निवासी संकुल, दुकाने, मॉल, हॉटेल, वैद्यकीय, शैक्षणिक संस्था आदी सुविधांनी भरून गेले आहे. वाहनांची रहदारीही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. येथील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना येथे करावा लागतो. शनिवारच्या आठवडा बाजारामुळे ही कोंडी अधिक उग्र रुप धारण करत असते. त्यामुळे येथे रस्तेरुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे, असे येथील रहिवाशांना वाटते.
हिरवाईची सोबत
संकुलापूर्वी येथे भरपूर वृक्षसंपदा होती. त्या वृक्षांना कोणतीही इजा न पोहोचवता विकासकाने इमारतींची उभारणी केली आहे. त्यामुळे वृक्ष आणि त्यांची सावली तसेच त्यांच्या फळांचा आस्वाद आजही येथील रहिवासी गुण्यागोविंदाने घेत आहेत. आताही संकुलात १२५ झाडे आढळतात. त्यात नारळाची झाडे मोठय़ा प्रमाणात आहेत. जांभूळ, आंबा, बदाम या फळझाडांसह गुलमोहर, केवडा आदी फुलझाडेही येथे आढळतात. सोसायटीने आणखी २५ झाडेही येथे लावली आहेत.
न्यू रचना पार्क, मनोरमा नगर, ढोकाळी गाव नाका, ठाणे (प)
सुहास धुरी
suhas.dhuri@expressindia.com