ठाणे : कळवा, रेतीबंदर येथून मुंब्रा शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या जुन्या मुंब्रा पूलालगत नवा रेल्वे पूल उभारला जात आहे. या पूलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन महिन्यांत या रेल्वे पूलाच्या दोन मार्गिका सुरु होणार आहेत. तर उर्वरित दोन मार्गिका डिसेंबरपूर्वी सुरु करण्याचा मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा (एमआरव्हीसी) मानस आहे. या पूलामुळे येथील वाहतुक कोंडीमध्ये घट होणार आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील वाहतुक कोंडी किंवा बाह्यवळणावरील धोकादायक प्रवास टाळण्यासाठी हजारो वाहने मुंब्रा पूल मार्गे मुंब्रा शहर किंवा ठाण्याच्या दिशेने वाहतुक करत असतात.
मुंब्रा शहराच्या वाहतुकीसाठी रेल्वे पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्य रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या जलद मार्गिकेवरील बोगद्या लगत हा पूल उभारण्यात आला होता. परंतु हा पूल अत्यंत जुना झाला आहे. काही वर्षांपूर्वी या पूलाचे सिमेंटचे कठडे देखील धोकादायकरित्या झुकले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने या पूलाची तात्पूर्ती दुरुस्ती केली होती. तसेच या जुन्या रेल्वे पूलालगत नव्याने एक पूल उभारण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरु होते. चार पदरी मार्गिकेचे मागील अनेक वर्षांपासून काम सुरू आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्ग टाळायचा असल्यास आणि ठाणे, कळवा येथून मुंब्रा शहरात किंवा मुंब्रा, शिळफाटा येथून ठाणे, कळव्याच्या दिशेने वाहतुक करायची असल्यास मुंब्रा रेल्वे पूलावरून वाहतुक करावी लागते. त्यामुळे शेकडो बसगाड्या, हलकी वाहने या रेल्वे पूलावरून वाहतुक करत असतात. येथील नवीन रेल्वे पूलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले मुख्य मार्गिकेला जोडला जाण्याचे काम येत्या काही दिवसांत हाती घेतले जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास येत्या दोन महिन्यांत चार पैकी दोन मार्गिका सुरु होणार आहे.
कामासाठी वाहतुक बदल
हा पूल मुख्य मार्गिकेला जोडताना येथून सुटणाऱ्या जड वाहनांना दोन महिने प्रवेशबंदीचा निर्णय ठाणे वाहतुक शाखेने घेतला आहे. येत्या काही दिवसांत ठाणे वाहतुक शाखा आणि एमआरव्हीसीचे अधिकारी पाहणी करणार आहेत. येथील काम सुरु झाल्यानंतर येथून जड वाहनांची वाहतुक बंद केली जाणार आहे. सुमारे ६० दिवस या कामासाठी परवानगी देण्यात आल्याची अधिसूचना ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढली आहे.
रेल्वेपूलाच्या दोन मार्गिकांचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. तसेच डिसेंबरपूर्वी उर्वरित दोन मार्गिका देखील पूर्ण केल्या जाणार आहेत. – सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, एमआरव्हीसी.