लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे: यंदाच्या पावसाळ्यापुर्वी ठाणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी रस्ते नुतनीकरण आणि दुरुस्तीची कामे मे महिनाअखेरपर्यंत पुर्ण करण्यात येणार असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून केले जात असतानाच, दुसरीकडे काही महिन्यांपुर्वीच नुतनीकरण करण्यात आलेला फ्लॉवर व्हॅली परिसरातील नवाकोरा रस्ता वाहिन्या टाकण्याच्या कामासाठी खोदण्यात आला आहे. यामुळे रस्ते कामावर खर्च झालेले पैशांचा चुराडा होण्याबरोबरच पालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचे दर्शन ठाणेकरांना पुन्हा एकदा झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. या खड्ड्यांच्या प्रवासामुळे ठाणेकरांमधून संताप व्यक्त होतो. गेल्यावर्षी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले होते. त्यात शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गाचा समावेश होता. या रस्त्याची काही ठिकाणी अक्षरश: चाळण झाली होती. या रस्त्यांवरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून नागरिकांनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर टिका केली होती. या टिकेनंतर पालिका प्रशासनाने पावसाळा संपताच अनेक रस्त्यांची कामे हाती घेतली. परंतु करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने पालिकेच्या तिजोरीत रस्ते कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नव्हता. यामुळे पालिकेने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेला ६०५ कोटी रुपयांचा निधी दिली आहे. या निधीतून सिमेंट काँक्रीट, मास्टीक आणि डांबरीकरणाच्या माध्यमातून रस्ते नुतनीकरण व दुरुस्तीची कामे सुरु आहेत. ही सर्व कामे मे महिनाअखेरपर्यंत पुर्ण करण्यात येणार असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून केले जात आहेत. तर, दुसरीकडे नवे कोरे रस्ते वाहिन्या टाकण्याच्या कामांसाठी खोदण्याचे काम सुरु झाल्याचे दिसून येते.
आणखी वाचा- डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे भूमाफियांनी महापालिका तोडकामाचा ताफा अडविला
मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांची गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात दुरावस्था झाली होती. पावसाळा संपताच पालिकेने या रस्त्यांचे नुतनीकरणाचे काम हाती घेतले. मास्टीक पद्धतीने या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांचा खड्डेमुक्त प्रवास होत होता. परंतु पावसाळा सुरु होण्यासाठी अवघा दिड महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना हा नवा कोरा रस्ता खोदण्याचे काम सुरु झाले आहे. काही महिन्यांपुर्वीच कोट्यावधी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेला फ्लॉवर व्हॅली परिसरातील नवा कोरा सेवा खोदण्यात आला असून तिथे वाहिन्या टाकण्याची कामे सुरु आहेत. याच मुद्द्यावरून पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली आहे. रस्त्यांची कामे करण्याआधीच वाहिन्या टाकण्याची कामे करणे गरजेचे होते. तसे शहरात होताना दिसून येत नसल्याने पालिकेच्या नियोजन शुन्य कारभाराचे ठाणेकरांना पुन्हा दर्शन घडले आहे.