ठाण्यात बिल्डरांच्या माध्यमातून ९५ कोटी रुपयांचे नवे रस्ते
बिल्डरांना विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) प्रदान करत शहरात मत्स्यालय, तारांगण, सेंट्रल पार्क, पोलीस ठाण्यांची निर्मिती करू पाहणाऱ्या ठाणे महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांचा अशाच पद्धतीने कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून बांधीव सुविधेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुमारे ९५ कोटी रुपयांचे नवे रस्ते उभारण्यात येणार आहेत. ठाणे रेल्वे स्थानक तसेच पोखरण मार्गावरील वेगवेगळ्या रस्त्यांच्या उभारणीसाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद केल्यानंतर बिल्डरांच्या माध्यमातून घोडबंदर मार्गावरील अंतर्गत रस्त्यांची बांधणी केली जाणार आहे.
यापूर्वी बांधीव सुविधेच्या माध्यमातून सुमारे १६६ कोटी रुपयांचे अतिरिक्त चटईक्षेत्र बिल्डरांना प्राप्त झाले आहे. असे असताना रस्ते उभारणीच्या माध्यमातून आणखी चटईक्षेत्र पदरात पाडून घेण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याने ठाण्यातील बिल्डरांना अच्छे दिनाची अनुभूती येऊ लागली आहे.
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था करप्रणाली रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिकांना जमा-खर्चाचे गणित जमविताना सरकारच्या अनुदानाकडे डोळे लावून बसावे लागत आहे. अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या तिजोरीत पुरेसे पैसे नव्हते. करवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करून हे चित्र बदलण्यात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना मोठय़ा प्रमाणावर यश आले असले, तरी शहरात मोठे प्रकल्प राबविण्यासाठी लागणारी आर्थिक रसद अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात पालिकेकडे उपलब्ध नाही. एकीकडे जुन्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रयत्न सुरू असताना बिल्डरांना कोटय़वधींचा विकास हस्तांतरण हक्क प्रदान करत विकास प्रकल्पांची आखणी केली जात असून याच माध्यमातून नव्या रस्त्यांचीही उभारणी करण्याची योजना नव्या स्वरूपात आखली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा