लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: संगनमत करुन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाची अडवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नालेसफाईची कामे करणाऱ्या चार ठेकेदारांना शहर अभियंता विभागाने गेल्या आठवड्यात वर्षभरासाठी काळ्या यादीत टाकले. तोंडावर आलेल्या पावसामुळे नालेसफाईची कामे झटपट मार्गी लागावीत म्हणून नालेसफाई कामांची शहर अभियंता विभागाने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

ठेकेदारांकडून निविदा दाखल झाल्यानंतर त्या विहित कालावधीत उघडून तातडीने पात्र ठेकेदारांना कामाचे आदेश देऊन त्यांच्याकडून नाले, प्रभागांतर्गत गटार सफाईची कामे सुरू केली जातील. ही कामे पाऊस सुरू करण्यापूर्वी पूर्ण केली जातील. तसे नियोजन प्रशासनाने केले आहे, अशी माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.

आणखी वाचा- डोंबिवलीतील ठाकुर्ली, कोपर उड्डाण पुलांवरील पथदिवे बंद

कल्याण, डोंबिवली विभागात ९० किलोमीटर लांबीचे लहान मोठे एकूण ७५ नाले आहेत. १० मोठे नाले आहेत. यात कल्याण मध्ये जरीमरी नाला, नांदिवली नाला, वालधुनी नाला, डोंबिवलीत भरत भोईर नाला, कोपर नाला यांचा समावेश आहे. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये पालिका प्रशासनाकडून नाले सफाईच्या कामांच्या निविदा काढून तात्काळ ठेकेदारांना कामाचे वाटप केले जात होते.

यावेळी भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण मधील प्रस्थापित मे. रिशी कन्स्ट्रक्शन, मे. सुमित मुकादम, मे. भावेश भोईर, मे. श्री. गणेश ॲन्ड कंपनी यांनी नाले सफाई कामासाठी पालिकेत २९ आणि ३० कमी दराने निविदा भरल्या. अन्य स्पर्धक ठेकेदार छाननीच्या वेळी या स्पर्धेत टिकला नाही. पालिकेने या चारही ठेकेदारांना अनामत रकमा भरण्यास कळविले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या चारही ठेकेदारांना शहर अभियंता विभागाने वाटाघाटी करुन कामाचे वाटप करण्यासाठी बोलविले. त्यालाही चारही ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. पालिकेची हेतुपुरस्सर अडणूक करण्याचा हा प्रकार आहे अशी खात्री झाल्याने आणि असे प्रकार ठेकेदारांकडून यापुढेही होण्याची शक्यता विचारात घेऊन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रशासनाची अडवणूक करण्याची भूमिका घेणाऱ्या चारही ठेकेदारांना वर्षभरासाठी पालिकेत काम करण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अनामत रकमाही जप्त केल्या. चार ठेकेदारांच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे प्रशासनाला नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागली.

आणखी वाचा- कल्याणमध्ये उद्वाहनाच्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

खड्ड्यांची कामे विलंबाने

रस्ते, चऱ्या भरण्याची कामे देण्याच्या वाटपात गैरप्रकार झाल्याची तक्रार उल्हासनगर येथील जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने आयुक्तांकडे केली आहे. चऱ्या भरण्याची ४५ कोटीची कामे स्पर्धा न करता ठेकेदारांना देण्यात आल्याचा स्पर्धक ठेकेदारांचा आरोप आहे. या आरोपांमुळे बांधकाम विभागाने या कामांना स्थगिती दिली आहे. पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई, खड्डे, चऱ्या भरण्याच्या कामांना विलंब होणार असल्याने यावेळी पावसाळ्यापूर्वी रस्ते, नाले सुस्थितीत असतील की नाही, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

ठेकेदारांना दणका

वर्षानुवर्ष पालिकेत ठाण मांडून साखळी पध्दतीने काम करणाऱ्या ठेकेदारांना गेल्या वर्षापासून प्रशासनाने चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्यास सुरुवात केल्याने स्पर्धक ठेकेदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही मोजके लोकप्रतिनिधी आणि त्यांचे समर्थक निविदा कामे घेण्यात नेहमीच आघाडीवर आहेत. ती साखळी यावेळी प्रथमच मोडण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New tender process for drainage works in kalyan dombivli municipality mrj