निसर्गाच्या सान्निध्यात आपले घर असावे, या आशेतून चौथ्या मुंबईच्या दारावर मुंबईतील अनेक चाकरमान्यांनी आपला मोर्चा वळवला. त्यातून अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले. मात्र नागरीकरणाच्या रेटय़ानंतरही या परिसरातील निसर्गसंपदा अद्याप टिकून आहे. बारवी धरण परिसरातील जंगलामुळे या निसर्गकोंदणात भर पडणार आहे.
बदलापूर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटरवर बारवी धरणक्षेत्र आहे. येथील तब्बल ७०० हेक्टर परिसरात वनराई पसरली आहे. त्यातील ३०० हेक्टर जमीन वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांतून पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आली आहे. बारवी जंगल सफारी म्हणून हे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येत असून त्यात पर्यटकांनी निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ रमावे, या अनुषंगाने जंगल क्षेत्रात काही गोष्टींची भर घालण्यात येत आहेत. ट्रेकिंगचा अनुभव देणारी पायवाट, झाडांच्या सान्निध्यात राहण्यासाठी बांबू हाट, कट्टा, कृत्रिम तलाव अशा अनेक गोष्टी पर्यटकांना अनुभवण्यास मिळणार आहेत. या भागात २५ प्रेक्षणीय पॉइंट बनवण्यात येणार आहेत. त्यातील काही पॉइंटवरून धरणक्षेत्र पाहता येईल. त्याचप्रमाणे जंगलातील प्राणी आणि पक्ष्यांचे निरीक्षण करता येणार आहे. त्यात सध्या क्रेझ असलेल्या सेल्फी पॉइंटचीही निर्मिती करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत या जंगलातील वानरांची संख्या वाढली असून इतर वन्यप्राण्यांचाही वावर वाढेल, असा विश्वास वन अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी या वेळी व्यक्त केला. त्यामुळे भविष्यात पर्यटनासोबत वन्यजीवही उघडय़ा डोळ्यांनी पाहणे शक्य होणार आहे. लवकरच येथे राहण्याची व्यवस्थाही तयार करण्यात येणार असून त्याचे कार्य प्रगतिपथावर आहे, त्यामुळे पर्यटकांना जंगल सफारीत रात्रीचा अनुभवही घेता येणे शक्य होणार आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समिती, कारंद आणि वन विभागाने यासाठी आराखडा तयार केला असून त्यासाठी शासकीय निधी आणि परवानगी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. त्यामुळे येत्या काही काळात एक नवे पर्यटन क्षेत्र म्हणून बारवी आणि बदलापूर विकसित होईल, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. त्यामुळे भविष्यात बदलापूरला पर्यटन क्षेत्र
म्हणून एक नवी ओळख मिळणार असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा