पूर्वा साडविलकर
ठाणे : मराठी नववर्षांच्या निमित्ताने घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा वर्षांनुवर्षे रुजली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत गुढीला पारंपरिक साधा साज देण्याऐवजी आकर्षक रूपडे देण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. गुढीसाठी खण, काठपदर, पैठणी, सिल्क कॉटन अशा विविध प्रकारच्या कापडांपासून केलेले वस्त्र बाजारात उपलब्ध असून त्याला मागणीही जोरात आहे.
गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारताना पूर्वी नव्या साडीचा वापर केला जात होता. गेल्या काही वर्षांपासून गुढीच्या वस्त्रांचा नवा ट्रेंड बाजारात पाहायला मिळत आहे. यामध्ये खण, काठपदर, पैठणी, सिल्क कॉटन, प्लेन कॉटन अशा कापडापासून हे वस्त्र तयार केले जाते. प्लेन कॉटनचे कापड आणि त्याला आकर्षक अशी रेशीम, साडीच्या काठापासून अशा प्रकारे हे वस्त्र गुढीच्या आकारानुसार तयार केले जात आहे. शिवणकाम करणाऱ्या महिलांकडे हे वस्त्र तयार करण्यासाठी मोठी मागणी यंदा नोंदवली जात आहे, अशी माहिती ठाण्यातील व्यावसायिक अर्चना परचुरे यांनी दिली. वस्त्राच्या आकारानुसार त्याची किंमत ठरवली जाते, असे त्या म्हणाल्या.
ऑनलाइन विक्रीही जोरात
ऑनलाइन बाजारातही आकर्षक असे गुढीचे वस्त्र विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या वस्त्रांना मोठी मागणी आहे. दोनशे ते पाचशे रुपयांना हे वस्त्र विकले जातात. गेल्या वर्षी ही किंमत कमी होती. यंदा मात्र मागणी खूपच वाढल्याने दरही वाढले आहेत, अशी माहिती मिहीर कांबळी या विक्रेत्याने दिली.
नववर्षांच्या गुढीला खास वस्त्रांचा साज; खण, काठपदराच्या कापडासोबत पैठणी, रेशीम, कॉटनचाही पर्याय
मराठी नववर्षांच्या निमित्ताने घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा वर्षांनुवर्षे रुजली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत गुढीला पारंपरिक साधा साज देण्याऐवजी आकर्षक रूपडे देण्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.
Written by पूर्वा साडविलकर
First published on: 01-04-2022 at 02:20 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New year gudi specially decorated paithani silk cotton options along with mine wood cloth gudi padwa 2022 amy