लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण संस्कृती मंचतर्फे आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. कल्याण पूर्व, डोंबिवली ग्रामीण भागात उप स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. परिसरातील नागरिक या यात्रांमध्ये सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याची ७५ वर्ष ही संकल्पना घेऊन कल्याण संस्कृती मंचतर्फे स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, सामरिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे देखावे चित्ररथांच्या माध्यमातून वाहनांवर उभारण्यात आले होते. हे चित्ररथ पाहण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
स्वागत यात्रेचे अध्यक्ष ॲड. निशिकांत बुधकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण मधील मुरबाड रस्त्यावरील सिंडीगेट येथून स्वागत यात्रेला प्रारंभ झाला. कल्याण शहरातील नागरिक, बालगोपाळ मंडळी स्वागत यात्रेत सहभागी झाली होती. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेली स्वागत यात्रा आयुक्त बंगला, संतोषी माता रस्ता, शिवाजी चौक, शंकरराव चौक, अहिल्याबाई होळकर चौक, पारनाका, लालचौकीमा्गे नमस्कार मंडळ येथे विसर्जित झाली.
कल्याण पूर्व भागात आ. गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत नागरिक आनंदाने सहभागी झाले होते. डोंबिवली ग्रामीण भागातील स्वागत यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.