फडके रोड तसेच गणेश पथ येथे रस्त्यांच्या सिमेंट क्राँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. यामुळे नववर्ष स्वागत यात्रेचा मार्ग बदलणार का असा सवाल उपस्थित होत असतानाच महापालिका प्रशासनाच्या वतीने त्यांना २१ मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या आश्वासनामुळे गणेश मंदिर संस्थानने नववर्ष स्वागत यात्रेच्या मार्गात बदल करायचा नाही, असा निर्णय घेतला आहे.  
नववर्ष स्वागत यात्रा किंवा दिवाळी पहाटेला डोंबिवलीतील फडके रोड येथे तरुणाईच्या उत्साहाचा झरा ओसंडून वाहताना दिसतो. नववर्ष स्वागत यात्रेची सांगताही येथील अप्पा दातार चौकात होते. पहाटे श्रीगणेशाचे दर्शन घेण्यासाठी येथील गणेश मंदिरात भाविकांची रीघ लागते. सध्या शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट क्राँक्रिटीकरणाची कामे सुरू असल्याने यात्रेत सामील होणारे रथ आणि तरुणांची गर्दी कशी हाताळायची हा प्रश्न नववर्ष स्वागत यात्रा संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सतावू लागला आहे. गर्दीचे नियोजन या कामांमुळे कठीण होऊन बसेल. त्यामुळे स्वागत यात्रेच्या मार्गात बदल करता येईल का, याची चाचपणी मध्यंतरी केली जात होती. मात्र, महापालिका प्रशासनाने गुढीपाडव्याच्या आधी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. जेवढे शक्य आहे तेवढे काम पूर्ण करून हा मार्ग खुला करण्यात येईल असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे मार्ग बदलण्याची आवश्यकता शक्यतो नसल्याचे समितीचे उपाध्यक्ष प्रवीण दुधे यांनी सांगितले. मात्र काही कारणास्तव काम झालेच नाही तर मात्र पर्याय म्हणून काय उपाययोजना करावी याविषयी अद्याप चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. संयोजिका दीपाली काळे याविषयी म्हणाल्या, काम पूर्ण झाले तर काहीच अडचण उरणार नाही.