जगातील उत्तम संगीत समूहांच्या साथीने मराठीतील अभिजात कविता नव्याने संगीतबद्ध करून मराठीचे विश्वरूप दर्शन घडवणाऱ्या ‘अमृताचा वसा’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा संगीतकार कौशल इनामदार यांनी रविवारी ठाण्यात केली. केशवसुतांपासून आजवरच्या अनेक नामवंत कवींच्या रचना असतील. या कवितांची नव्या पिढीवर भुरळ पडावी, यासाठी हा प्रकल्प हाती घेतल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
कौशल इनामदार, ‘इंद्रधनु’ आणि ‘मराठी अस्मिता परिवार’ यांनी मिळून गडकरी रंगायतन येथे ‘मराठी अभिमान गीत-एक आनंदयात्रा’ ही मैफल घेतली होती. कौशल इनामदार यांनी मराठी अभिमान गीताची निर्मिती कशी झाली आणि त्यामागची नेमकी कारणे काय होती, याचा सविस्तर उलगडा केला.
यावेळी त्यांनी कवी सुरेश भट आणि अशोक बागवे यांच्या काव्य रचना सादर केल्या, तसेच काही गीतेही सादर केली. त्यास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात मराठी अभिमान गीताविषयी माहिती देत असतानाच त्यांनी ‘अमृताचा वसा’ या महत्वकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. तसेच या प्रकल्पाचा श्रीगणेशा या वेळी करण्यात आला. पाच वर्षांपूर्वी ठाणे शहरातून मराठी अभिमान गीतांच्या निमित्ताने मराठी गीत-संगीताविषयी अस्मिता जागृत करणाऱ्या चळवळीविषयी इनामदार यांनी सांगितले.
मराठी भाषेतील अजरामर काव्यरचनांची एक दृकश्राव्य फित (व्हिडीओ अल्बम) सध्या कौशल इनामदार संगीतबद्ध करीत असून त्यात जगातील पाचही खंडांतील मराठी गायक, वादकांचा सहभाग असेल. मराठी कवितांच्या या दृकश्राव्य फितीमध्ये दिग्गज कलावंत सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा