कल्याण – दुर्गाडी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. शिवरायांच्या आरमाराचा पाया याच किल्ल्याने घातला गेला. साडेतीनशेहून अधिक वर्षांचा इतिहास दुर्गाडी किल्ल्याला आहे. नुकतीच शहरात धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने दुर्गाडी किल्ल्यालाही चांगली रंगरंगोटी करण्यात आली आहे. परंतु दुर्गाडी किल्ल्याला रंगरंगोटीची नव्हे तर डागडुजीची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवाने त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. ऐतिहासिक कल्याण शहरातील ही एक ठळक वास्तुखूण आहे. मात्र त्याचे जतन व्हावे असे कुणालाही वाटत नाही. या किल्ल्याची एक संरक्षक भिंत ढासळली असून ती त्वरित दुरुस्त करण्यात यावी हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. जयंती साजरी केली म्हणजे शिवबांवर आमचे खूप प्रेम आहे असे होत नाही. तर त्यांचा ऐतिहासिक ठेवा, त्यांची संपत्ती जतन करून ठेवणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने या ऐतिहासिक ठेव्यांच्या जतनाकडे लक्ष द्यावे.
भटक्या कुत्र्यांची दहशत आवरा
सत्यजीत शहा, ठाणे</strong>
हाइड पार्क रहिवासी संकुलामध्ये आणि बाजूच्या ग्रीनवुडमध्येही जवळपास ११०च्या वर भटके कुत्रे आहेत. या कुत्र्यांचा या सोसायटय़ांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्रास होत आहे.
भटके कुत्रे येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ांच्या मागे धावत असतात. त्यांचे निर्बीजीकरण होत नाही. यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करूनही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. परिसरात खेळणाऱ्या मुलांनाही या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. शहरात अंदाजे ५० हजार ते ७० हजार भटके कुत्रे असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दररोज २५ ते ३० जणांना श्वानदंश होतो. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
‘शेअर’ रिक्षा तरी मिळावी
राजेश वनमाळी, डोंबिवली
रिक्षाचालकांची दादागिरी ही तर नित्याचीच झाली आहे. त्यांच्या मनमानीला कुणीही आळा घालत नाही. शहरात मीटरप्रमाणे रिक्षा चालत नाही, मग किमान शेअर रिक्षा तरी मिळावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. परंतु शहरातील काही मोक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी शेअर रिक्षा मिळत नाही. स्टेशनला येताना त्या भागातून रिक्षा मिळते, मग जाताना का नाही? रिक्षाचालक त्यांच्या मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. जाताना शेअर रिक्षा मिळते तर येताना मात्र स्वतंत्र रिक्षा करावी लागते. शिवाय रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारतात. त्यांना लांबचे भाडे हवे असते. त्यामुळे अनेकदा ठाकुर्ली स्टेशन, न्यू आयरे रोड, आयरे गाव, सागाव सागर्ली, टिळकनगर आदी ठिकाणी जाण्यासाठी शेअर रिक्षा मिळत नाही. जर शहरात मीटरप्रमाणे रिक्षा चालत नाही, शेअर रिक्षा चालतात, तर वाहतूक विभागाने या शेअर रिक्षांसाठी कठोर नियम करावेत.