सर्वसामान्यांकडे डोळेझाक नको
अॅड. तन्मय केतकर
कल्याणमध्ये रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाला केलेली मारहाण आणि त्यानंतर पोलिसांनी या मुजोर रिक्षाचालकांविरोधात घेतलेली भूमिका जर यापूर्वीच घेतली असती तर त्याला सामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळाला असता.
कल्याण स्थानकाबाहेर एका वाहतूक पोलिसाने रिक्षाचालकाला हटकले असता त्यांच्यात वादावादी होत रिक्षाचालकाने त्या पोलिसास मारहाण केली. मुख्य म्हणजे एकही नागरिक या प्रकरणात मध्ये पडला नाही, सगळ्यांनी दुर्लक्ष केले. पुन्हा ‘झाले ते फार वाईट झाले’ असेही कुणी म्हणताना आढळला नाही. झाल्या प्रकाराची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केली. रिक्षाचालकांची मुजोरी सहन करणार नाही, अशा वल्गनाही करून झाल्या.
याला कारण सर्वस्वी हे पोलीसच आहेत. आता या घटनेतील पोलीस आणि नागरिक या दोघांची अदलाबदली केली तर हा प्रकार काही नवा नाही. असे प्रकार सर्रास सुरूच असतात. फरक इतकाच की, त्यात सर्वसामान्य नागरिक भरडले जात असताना या सगळ्या प्रकाराकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. आजतागायत या रिक्षाचालकांनी कितीतरी नागरिक विशेषत: अपंग, रुग्ण, वृद्ध, गरोदर स्त्रिया, लहान मुले सोबत असलेल्या कित्येक जणांना वेळोवेळी नडलेले आहे, छळलेले आहे. इतके दिवस हे सगळे असेच चाललेले होते. यावेळी पोलीस प्रशासन या प्रकारांकडे डोळेझाक करत होते. मात्र याची धग आता पोलिसांनाही बसली आहे. यामुळेच पोलिसांनी मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस आणि रिक्षाचालक यांच्यात घडलेली ही घटना केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण असून पोलीस आणि प्रशासनाने वेळीच जागे होणे गरजेचे आहे. सर्व सरकारी व्यवस्था कमी जास्त प्रमाणात कुचकामीच ठरत आहे. परिणामी प्रत्येक बाबतीत मुजोर प्रकार, गैरव्यवहार सुरूच होते आणि आजही सुरू आहेत. या व्यवस्था अशा भ्रमात होत्या की बाकी कुठेही काहीही होऊ दे, आपल्याला त्याचा त्रास व्हायची सुतराम शक्यता नाही. कारण आपण सत्ताधीश आहोत. असेच त्यांना वाटत होते.

प्रीपेड रिक्षाचे वाजले की बारा
अरविंद बुधकर
कल्याण महानगरपालिका निवडणुकीपूर्वी कल्याणमध्ये प्रीपेड रिक्षा मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आली. तसे तत्कालीन रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी आपल्या मुलाखतीत अधिकृतपणे घोषणाही केली. अशा रीतीने त्यांनी ‘करून दाखवल्याचे’ बिगुल वाजवले असले तरी सध्या प्रीपेड रिक्षांचे वास्तव वेगळे आहे. मी रात्री उशिरा येताना या प्रीपेड रिक्षाचा प्रवासासाठी उपयोग करीत असे. कारण लालचौकी येथे रात्री रिक्षा मिळणे कठीण होत असे. प्रिपेड रिक्षांची योजना वाजवी आणि चांगली सुरक्षित होती. काही चांगले रिक्षाचालक ज्यांना नीट व्यवसाय करायचा आहे ते बिचारे प्रवाशांशी हुज्जत न घालता मुकाटपणे भाडय़ासाठी होकार देत असत. परंतु सध्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील प्रीपेड रिक्षाचे कार्यालय रात्रीच्या वेळी बंदच असल्याचे पाहायला मिळते. रिक्षा संघटनांचा प्रीपेड रिक्षा सेवेवर वचक नसेल तर ही योजना सुरू करण्यामागचे प्रयोजन काय होते? असा प्रश्न पडला आहे. प्रिपेड रिक्षा सेवा सुरळीतपणे चालते आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची?

.. तरच कल्याण-डोंबिवली स्मार्ट होईल!
सुयश पेठे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नागरिकांच्या स्वप्नातील स्मार्ट शहर कसे असावे, या उद्देशातून ठिकठिकाणी बुथ उभारून प्रश्नावली तयार केलेले अर्ज नागरिकांकडून भरून घेतले. किंबहुना हे काम अजूनही सुरू आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटीविषयक एसएमएसही (संदेशाद्वारे) मोबाइलवर पाठविण्यात येत आहेत. महापालिकेचे हे उपक्रम खरोखरच स्तुत्य म्हणावे लागतील. त्यासाठी कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्वाचित महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त ई रवींद्रन यांचे कौतुक करावयास हवे. या मोहिमेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देताना महापालिकेतील सोनेरी टोळी, नवीन नगरसेवकांच्या दबावाला बळी न पडता अनाठायी खर्च टाळावा. जे स्वीकृत नगरसेवक होणार आहेत, त्याबाबत सर्व पक्षांनी अभ्यासू, तज्ज्ञ लोकांची निवड करून नवीन पायंडा पाडावा. पराभूत, अशिक्षित, गुंड प्रवृतीच्या उमेदवारांना प्रवेश देऊ नये. माननीय महापौरांनी पक्ष श्रेष्ठींपुढे झुकता कामा नये. आयुक्तांनी ज्या नगरसेवकांनी नियमांचे उलंघन केले म्हणून नोटिसा दिल्या आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी. हे जेव्हा होईल तेव्हा स्मार्ट सिटीच्या दिशेने महापालिकेचे पाऊल पडतेय, असे लोकांना वाटेल.

Story img Loader