कल्याण येथील सम्राट अशोक विद्यालयात वृत्तपत्रे विद्यार्थ्यांना वाचनासाठी देऊन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मागील अनेक वर्षापासून हा उपक्रम अशोक विद्यालयात साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचे महत्व कळावे आणि त्यांच्यातील वृत्तपत्र वाचनाची गोडी कायम रहावी या उद्देशातून हा उपक्रम आम्ही नियमित राबवितो, असे या शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
माजी राष्ट्रपती डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून देशभर वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना भाषणे किंवा एकत्रित जमवून मार्गदर्शन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना विविध प्रकारची वृत्तपत्रे वाचन प्रेरणा दिनी वाचण्यासाठी दिली जातात. त्यांना वृत्तपत्रांचे लोकशाहीतील स्थान आणि चौथा स्तंभ वर्तमानपत्राकडून बजावण्यात येणारी भूमिका याविषयी मार्गदर्शन केले जाते, असे मुख्याध्यापक पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>> जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन महत्वाचे; अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांचे प्रतिपादन
अशोक विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी शंतनु शिवाजी पंडित याने माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची वेशभूषा केली होती. शाळेच्या पटांगणात सामुहिक वाचनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मधोमध बसून तो वर्तमानपत्र वाचन करत होता. शंतनु याने अब्दुल कलाम यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. वर्तमानपत्र वाचनातून मोठ्या झालेल्या राष्ट्रपुरुषांचा परिचय यावेळी करून देण्यात आला. स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी वृत्तपत्रांनी बजावलेली भूमिका याचेही महत्व यावेळी विशद करण्यात आले. वर्तमानपत्र कार्यालयाचे कामकाज कसे चालते याचीही माहिती यावेळी देण्यात आली.