स्वधिष्ठान सामाजिक संस्था
खरेतर तारुण्याच्या टप्प्यावर त्यांची पावले पाटर्य़ाकडे वळायला हवी होती. पण शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी निर्माण झाली. ‘स्वधिष्ठान’ या तरुणांच्या सामाजिक संस्थेची. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक अत्याचार कायद्याविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी माहितीपर व्याख्याने झाली.
महाविद्यालयात शिकत असताना अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी या हेतूने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी.सारखे उपक्रम महाविद्यालयात राबवले जातात. महाविद्यालयात शिक्षण पूर्ण होईपर्यंत या उपक्रमात विद्यार्थ्यांचा हिरिरीने सहभाग असतो. आपण समाजासाठी काहीतरी करावे याची जाणीवही याच काळात मनात रुजते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र काही कारणाने समाजकार्याची इच्छा अपूर्ण राहते आणि राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी.सारख्या उपक्रमांशी संबंधही संपतो. ओनिल कुलकर्णी या तरुणाने मात्र महाविद्यालयात निर्माण झालेली सामाजिक कार्याची आवड आजही कायम ठेवली आहे. ओनिलच्या संकल्पनेतून स्वधिष्ठान ही संस्था ६ मे २०१३ला स्थापन झाली. ओनिल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एखाद्या संस्थेत खाद्यपदार्थाचे वाटप करणे, वृद्धाश्रमात जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करणे यापासून संस्थेच्या उपक्रमांना सुरुवात झाली. मात्र एखाद्या संस्थेला भेटवस्तू दिल्यावर तो प्रश्न किंवा समस्या सुटत नसते याची जाणीव संस्थेच्या तरुणांना झाली. या मदतकार्यापेक्षा नागरिकांमध्ये, विचारांमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे, हे जाणवल्यावर या तरुणांचा नागरिकांच्या विचारात सकारात्मक बदल घडवण्याकडे प्रवास सुरू झाला. ओनिल याने बालहक्क आणि बालशिक्षण या विषयात पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करून समाजकार्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले. लोकांच्या विचारात बदल घडवून आणण्यासाठी स्वधिष्ठानच्या वतीने ठाणे, मुंबईत जनजागृती, चर्चासत्र, व्याख्याने आयोजित केली जातात. स्वधिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘आपला ध्वज, आपला अभिमान’ या जनजागृती मोहिमेत ध्वजसंहितेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते. शहरातील गृहसंकुलात, फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरुण हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असतात.
मुलांसाठी विशेष कार्य
वर्षभरापासून स्वधिष्ठानतर्फे महिला आणि लहान मुलांसाठी काम केले जात आहे. महिला, लहान मुले लैंगिक अत्याचार, त्याविषयक कायदे यांविषयी शाळा, महाविद्यालयात जागृती करण्यात येत आहे. कुटुंब जीवन शिक्षण या विषयावर व्याख्यान दिले जाते. वयात येताना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. त्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ मंडळींच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. संस्थेत असणाऱ्या इतर तरुणांचेही सामाजिक विषयात शिक्षण झालेले असल्याने पद्धतशीर काम करण्याची सवय प्रत्येक सदस्याला आहे.
किन्नरी जाधव kinnari.jadhav@expressindia.com