पहिल्या राष्ट्रपतींनी कौतुक केलेल्या काशिमीरा येथील ज्ञानमंदिराचा कायापालट
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भेट दिलेली काशिमीरा येथील आदिवासी शाळा आज जीर्ण अवस्थेत उभी आहे. झुकलेले, कधीही मोडून पडेल असे छप्पर, तुटलेल्या खिडक्या, गिलावा उडालेल्या भिंती अशा भीतिदायक वातावरणात परिसरातले गरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेचे हे निराशावादी चित्र लवकरच पालटणार आहे. भारत विकास परिषद या स्वयंसेवी संस्थेने शाळेचे रूपडे बदलण्याचा निर्णय घेतला असून शाळा लवकरच नव्या रूपात उभी राहणार आहे.
काशिमीरा परिसरातल्या महाजनवाडी येथे १९४६ मध्ये आदिवासी सेवा मंडळ या विश्वस्त संस्थेने या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थापन झालेली ही शाळा सुरुवातीच्या काळात कुडाच्या भिंती असलेल्या झोपडीमध्ये भरू लागली. मीरा गाव, पेणकर पाडा येथील आदिवासी विद्यार्थी शाळेत शिक्षण घेऊ लागले. पुढे पक्क्या भिंतीच्या कौलारू शाळेत तिचे परिवर्तन झाल्यानंतर १९५१मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या शाळेला भेट दिली. आदिवासींसाठी शाळा चालवत असलेल्या या संस्थेचे राष्ट्रपतींनी तोंडभरून कौतुकही केले.
या घटनेला ६५ वर्षे उलटल्यानंतर शाळा आजही त्याच कौलारू इमारतीत भरत आहे. केवळ आदिवासींसाठी सुरू झालेल्या या शाळेत आज ४३ आदिवासी विद्यार्थ्यांसह इतर जाती-धर्माचेही परंतु गरीब घरातले १८१ विद्यार्थी संपूर्णपणे मोफत शिक्षण घेत आहेत. पहिली ते सातवी इयत्ता असलेल्या या शाळेत सात शिक्षक विद्यादानाचे काम करत आहेत. शाळेत एकही शिपाई अथवा रखवालदार नाही. स्वच्छतागृहापासून ते वर्गखोल्या साफ करण्याचे काम शिक्षकच पार पाडतात. शिक्षकांचा पगार सरकारी अनुदानावर होतो, परंतु शाळेचा इतर खर्च मात्र शिक्षक स्वत:च भागवतात, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कालावती राऊत यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तकेच शासनाकडून पाठवली जातात. मात्र वह्य़ा, गणवेश, दप्तर यासाठी एखादा दाताच शोधावा लागतो. दहिसर येथील लायन्स क्लबचा या शाळेला मात्र कायम मदतीचा हात असतो. अशा परिस्थितीतही अनेक गुणवंत विद्यार्थी या शाळेने दिले.
६५ वष्रे भार वाहिल्यानंतर शाळेची कौलारू इमारत आता खिळखिळी झाली आहे. ती कधीही कोसळेल, अशी भीती मनात बाळगत शिक्षक दिवस ढकलत होते. शाळेकडून दरवर्षी तात्पुरती डागडुजी केली जाते. शाळेची ही अवस्था पाहून शाळेचेच उन्मेश नार्वेकरसारखे काही माजी विद्यार्थी पुढे आले. भारत विकास परिषद या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शाळेला पुन्हा नवा चेहरा द्यायचे मनाशी ठरवले आणि ते प्रत्यक्षात उतरवले. भारत विकास परिषद या शाळेसाठी तब्बल २० लाख रुपये खर्च करत आहे. शाळेचे जुने छप्पर बदलून त्याजागी नवे मजबूत छप्पर घालण्यात येणार आहे. खिडक्या-दारे यांची दुरुस्ती तसेच भिंतींनाही सिमेंटचा गिलावा नव्याने करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेला डीएचएफएल या बहुराष्ट्रीय कंपनीचीही मदत होत आहे, असे भारत विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सागितले.

Story img Loader