ठाणे : एकीकडे पर्यावरणपुरक गणेश मुर्ती विसर्जनासाठी करोडो रुपये खर्चुन कृत्रिम तलावांची उभारणी करून देखावा पालिकेकडून उभा केला जात असून दुसरीकडे या तलावांमध्ये विसर्जित झालेल्या मुर्तींचा मलबा ठाणे खाडीत कोणत्याही प्रक्रीयेविनाच टाकला जात आहे. याच प्रकारावरून राष्ट्रीय हरीत लवादाने मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पालिकेला खडेबोल सुनावत कान पिळले.
हेही वाचा >>> ठाणे, कल्याणमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली
ठाणे महापालिका क्षेत्रातील खाडी किनारी भागात सात विसर्जन घाट आहेत. शहराच्या विविध भागात पालिकेने १५ कृत्रिम तलाव उभारले आहेत. शिवाय, ४२ ठिकाणी विशेष टाकी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी शहरातील गणेश मुर्ती विसर्जन करण्यात येत आहेत. शहरात दिड आणि पाच दिवसांच्या एकूण ३१ हजार ८०८ इतक्या गणेश मुर्तीचे विसर्जन झाले आहे. पैकी कृत्रिम तलावात १२ हजार ५२१, विसर्जन घाटात १६ हजार ७०३ आणि विशेष टाकीमध्ये २ हजार ५८४ गणेशमुर्तींचे विसर्जन झाले आहे. परंतु केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार ठाणे खाडीत गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंदी आहे. तरीही ठाणे खाडीत मुर्ती विसर्जन केले जात असून त्याचबरोबर कृत्रिम तलावात विसर्जित होणाऱ्या मुर्ती खाडीत टाकण्यात येत आहे. या संदर्भात ठाण्यातील पर्यावरण प्रेमी रोहित जोशी यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची २६ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यात राष्ट्रीय हरीत लवादाने ठाणे खाडीत गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंदीच्या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, कृत्रिम तलावात विसर्जित होणाऱ्या मुर्ती खाडीत टाकण्यासही मज्जाव केला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या दहा दिवसांच्या गणेश मुर्ती विसर्जाची सर्वत्र तयारी सुरू असतानाच, हरित लवादाचे असे आदेश आल्याने पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
कृत्रिम तलाव संकल्पनेला हरताळ
ठाणे शहरातील तलावांचे प्रदुषण होऊ नये तसेच पर्यावरणपुरक विसर्जन व्हावे यासाठी पालिकेकडून गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संकल्पना राबविण्यात येते. यंदा कृत्रिम तलावांबरोबरच गृहसंकुलांच्या परिसरात पालिकेने विसर्जनासाठी टाकी व्यवस्था उभारण्यात उपलब्ध करून दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केल्याचे समाधान नागरिकांना मिळत असले तरी वस्तुस्थिती अगदी वेगळी असल्याचे समोर आले आहे. महापालिका कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनानंतर जमा होणारा मलबा सरतेशेवटी एकत्र करून ठाणे खाडीत फेकून देते. एका बाजूला पर्यावरण रक्षणाचे धडे द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला सर्व कायदे नियम मोडायचे, असा काहीसा प्रकार सुरू आहे. यामुळे प्रबोधनाच्या जाहिराती, कृत्रिम तलाव उभारणीसाठी खर्च होणाऱ्या करोडो रुपयांचा चुराडा होत आहे. तसेच कृत्रिम तलाव संकल्पनेला हरताळ फासला जात आहे, असे याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी सांगितले.
हेही वाचा >>> येऊरमधील बेकायदा बंगल्यांवरील कारवाई थांबली; कारवाईसाठी तक्रारदाराचे येऊरमध्ये उपोषण सुरू
अंबरनाथमध्ये रोटरी क्लबतर्फे पीओपी मुर्तीचे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन आणि विघटन करण्याचा प्रयोग रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थकडून राबवला जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात कॅल्शियम सल्फेट म्हणजे पीओपीच्या मूर्ती, अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणात विसर्जित केल्यानंतर मूर्ती विरघळतात आणि उरलेला गाळ अर्थात कॅल्शियम सल्फेट या नावाचे अतिशय उत्कृष्ट खत तयार होते, ते खत शेतीसाठी वापरू शकतो. यामुळे घरोघरी प्रतिष्ठापना होणाऱ्या पीओपीच्या गणश मुर्तीचे घरच्या घरी करता येऊ शकते. अमोनियम बायकार्बोनेट खाण्याच्या सोड्यासारखाच सौम्य असून हाताळताना हातांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. घरी हा प्रयोग राबवल्यास ४८ तासात मुर्तीचे विघटन होते. साधारणपणे १० किलो वजनाच्या मुर्तीतून ५ ते ६ किलोचे खत मिळू शकते. असे प्रयोग होणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.