डोंबिवली : जम्मु काश्मीरमधील पेहलगाम बैसरन येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी डोंबिवलीत येऊन तिन्ही मृत पर्यटक संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने कुटुंबीयांची चौकशी केली. मंगळवारी हल्ला झाला त्यादिवशी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने पीडित कुटुंबीयांकडून घेतली.आपल्या घरातील कर्त्या सदस्याला दहशतवाद्यांनी आपल्या समोरच अतिशय क्रूर पध्दतीने मारल्याने पीडित कुटुंबीय हादरून गेले आहेत. त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अतिशय शोकाकुल असलेल्या संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने डोंबिवलीत येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांची राहत्या घरी भेट घेण्याचा प्रयत्न केला.

पहलगाम बेसरन येथे आपण पर्यटन करत असताना दहशतवादी कोठुन आले. ते कोणत्या वेशात होते. दहशतवाद्यांकडून हल्ल्याची घटना घडत होती, त्यावेळी आपण काय करत होता. दहशतवादी आपल्यापर्यंत पोहचले त्यावेळी आपण काय भूमिका घेतली. इतर पर्यटक त्यावेळी काय करत होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने लेले, जोशी आणि कुटुंबीयांना शोकाकुल अवस्थेत बोलते करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती देत असताना पीडित कुटुंबातील प्रत्येक सदस्य अतिशय शोकाकुल होत होता. तोंडातुन त्यांच्या शब्द फुटत नव्हते. उत्तर देण्यासाठी कुटुंबीयांची मानसिकता नव्हती. अशा दुखद, शोकाकुल परिस्थितीत माहिती घेणे उचित होणार नाही. परिपूर्ण माहिती अशा पध्दतीने घेणे योग्य ठरणार नसल्याचा विचार करून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने चौकशी थांबविण्याचा निर्णय घेतला. मिळालेली जुजुबी माहिती हाती घेऊन पुढील तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक येत्या चार दिवसात पुन्हा डोंबिवलीत दाखल होणार आहे. त्यावेळी लेले, मोने आणि जोशी कुटुंबातील जे सदस्य पहलगाम येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्याकडून हल्ल्याच्यावेळच्या घटनेची माहिती तपास पथक करणार असल्याचे सुत्राने सांगितले.

दहशतवाद्यांना गोळ्या घाला

आपले वडील, काका, मामा यांना दहशतवाद्यांनी ज्या क्रूरपणे आमच्या समोरच मारले. त्या दहशतवाद्यांना सरकारने दिसता क्षणीच गोळ्या घालून ठार मारावे. मग ते दहशतवादी देशाच्या कोणत्याही सीमेवर असु दे. त्यांना जागेवरच ठोकुन काढण्याची गरज आहे, अशी तीव्र भावना पर्यटक दिवंगत संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली.

आमच्या कुटुंबीयांवर हल्ला करणारे पर्यटक सिनेमातील दृश्यातील दहशतवाद्यांप्रमाणे पोशाख करून आले होते. त्यांच्या कपाळावरती गोप्र कॅमेरा होता. तुम्ही लोकांनी काश्मीरमध्ये दहशत माजवली आहे, असे बोलुन तुमच्यात हिंदु कोण आहेत असे बोलुन त्यांनी संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने यांनी हात वर करताच त्यांच्यावर धडाधड गोळ्या चालवून ते निघून गेले. अशा दहशतवाद्यांना दिसतील तेथे गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी मागणी हर्षल यांनी केली.