सात जणांना अटक
वसई : नालासोपाऱ्यात राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांनी दोन इमारतीत अनधिकृत बनवलेले बार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून उद्ध्वस्त केले. याप्रकरणी दोन महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली. तर ३५ जण पळून गेले.
नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमधील नूर आणि जय माता दी अपार्टमेंट या इमारतीतील तीन सदनिकांमध्ये काही नायजेरियन तरुणांनी अनधिकृतपणे बार थाटल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हेचे पथक अतिरिक्त पोलीस फौजफाटा घेऊन बुधवारी तिथे पोहोचले. नूर अपार्टमेंटमधील १०१, २०१ क्रमांकाच्या सदनिकेत आणि जय माता दी अपार्टमेंटच्या १०१ क्रमांकाच्या सदनिकेत अनधिकृत बार आढळून आला.
या छाप्यात चर्सी जोसेफ आफिया, किंगसी अमू कमरम, एनानू ग्रीशा पीटर बाब्राह, किंगस ओबीनो ओबीनाली, रोझ फॉबोरोडे, नाकोंडे इस्यर आणि नॉनयालूझी जस्टीन यांना अटक करण्यात आली. या बारमधून विविध कंपनीच्या बीअर, वाइन, व्हिस्कीचा साठा जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. या बारमध्ये नायजेरियन तरुण जमून रात्रभर धिंगाणा घालत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जुगाराचे अड्डे उद्ध्वस्त
शहरातील उच्चभ्रू वर्तुळात सुरू असलेले दोन जुगाराचे अड्डे स्थानिक गुन्हे शाखा आणि नालासोपारा पोलिसांनी उघडकीस आणले. अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या द व्हिलेज फॉर्म हाऊस या रिसॉर्टमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, त्यानुसार छापा टाकून ८ आरोपींना अटक केली. नालासोपारा येथील शुभम इमारतीत जुगार अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला. त्यात सहा जणांना अटक केली.