बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित केली होती. या जागेवर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे काँग्रेस तर्फे इच्छुक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने निलेश सांबरे यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळवली. वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक खात्यावरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्यासमोर आता सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश सांबरे यांचेही आव्हान उभे टाकले आहे.
ठाणे जिल्ह्यात ठाणे कल्याण आणि भिवंडी या तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये कशी लढत होईल याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. येथे शिवसेना शिंदे गटातर्फे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. तर ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे राजन विचारे यांना उमेदवारी घोषित केली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि खासदार कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी घोषित केली आहे. ही जागा काँग्रेसच्या खात्यात होती. गेली दोन टर्म येथे काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला देऊ केली पक्षातर्फे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी घोषित केली. या जागेवर सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे निलेश सांबरे इच्छुक होते.
हेही वाचा >>>कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पाला पुन्हा भीषण आग, दहा दिवसाच्या कालावधीत दुसऱ्यांदा आग
त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे उमेदवारीसाठी जोर लावला होता. मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे ते अपक्ष रिंगणात उतरतील अशी अपेक्षा होती. मात्र गुरुवारी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघात निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कपिल पाटील सलग दोन टर्म इथून खासदार आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यमंत्रीपदाची संधी दिली होती. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवरून भाजप आणि सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातूनही त्यांना बराच काळ मोठा विरोध होता. आता शिवसेना-भाजप महायुतीने त्यांच्यासाठी प्रचार सुरू केला असला तरी त्यांच्यासमोर अंतर्गत गटबाजीचे मोठे आव्हान आहे. समोर महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटांमध्ये विसंवाद आहे. त्यातच जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.