ठाणे: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रौत्सवात रास-गरबा खेळण्यासाठी परिधान करण्यात येणारा घागरा, दांडिया, विविध प्रकारचे दागिने बाजारात दाखल झाले आहेत. नवरात्रौत्सवाच्या काळात प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करण्याचा कल अनेक वर्षांपासून सुरु असून त्यालाच आता नवरंगीत दागिन्यांची जोड मिळाली आहे. यामुळे यंदा रंगांच्या कपड्यांसोबतच नवरंगाचे दागिने बाजारात उपलब्ध होऊ लागले आहेत. यामध्ये मंगळसुत्राचे पेंडेंट, कानातले अशा दागिन्यांचा समावेश आहे.
नवरात्रौत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा उत्सव साजरा करण्यात महिला आघाडीवर असतात. गेल्या काही वर्षांपासून उत्सवाच्या काळात नऊ दिवसांच्या नऊ रंगाचे वेळापत्रक ठरलेले असते. यानुसार महिला ठरलेल्या दिवसाप्रमाणे रंगाचे कपडे परिधान करतात. पुरुषही अशा रंगाचे कपडे परिधान करू लागल्याचे दिसून येते. कपड्यांसोबतच साजश्रृंगार वाढवण्यास मदत करणारे दागिने खरेदी करण्यास महिलांची गर्दी दिसून येते.
हेही वाचा… डोंबिवलीजवळील खोणी गावात २१ लाखाची वीज चोरी
यंदा दागिन्यांमध्ये नव्या प्रकारचे दागिने दिसून येत आहेत. यामध्ये नऊ दिवसांच्या रंगावर मॅचिंग दागिने उपलब्ध आहेत. मंगळसूत्रामध्ये प्रत्येक दिवसाच्या रंगाप्रमाणे पेंडेंट उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्टोन पेंडेंट, मोती घुगरी, क्रिस्टल पेंडेंट असे प्रकार आहेत. मंगळसूत्राच्या काळ्या पोतीसह नऊ रंगाचे पेंडेंट सेट पाहायला मिळतात. या दागिन्यांची किंमत सुमारे साडे तीनशे ते एक हजार रुपयापर्यंत आहे. ऑक्साइट दागिन्यांची मागणी मागील वर्षापासून वाढली आहे. क्रिस्टल खड्यांमध्ये विविध रंगामध्ये हे दागिने बाजारात दाखल झाले आहेत.
विविध रंगाच्या धाग्यांपासून दागिने
हाताने तयार करण्यात येणारे दागिने वापरण्याकडे देखील अनेकांचा कल दिसून येतो. त्यामुळे लाल, पिवळा, गुलाबी, निळा, हिरवा धाग्यांपासून दागिने तयार केले जात आहेत. यामध्ये लहान, मोठे हार, चौकर, बांगड्या, कंबरपट्टा, बिंदी उपलब्ध आहेत. जे घागरा-चोळीवर अधिक शोभून दिसतात.
घागरा-चोळी, केडीया, धोती सूट, विविध नक्षीकाम असणारे दुपट्टे देखील बाजारात दाखल झाले आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे गरब्यासाठी परिधान केले जाणारे कपडे यामध्ये पाहायला मिळत आहेत. एक हजारापासून चार हजार किंमत असणारे घागरा चोळी उपलब्ध आहेत.