ठाणे : शहरातील काही शिधावाटप दुकानदार सर्वसामान्यांच्या ठरावीक हिश्श्यातील धान्याची लूट करीत असल्याच्या तक्रारीनंतर दोषी दुकानदारांवर कारवाईसाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेतली. यात चौकशीनंतर शहरी भागांमधील सहा शिधावाटप दुकानांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय, एकूण नऊ अधिकृत शिधावाटप दुकाने निलंबित करण्यात आली. यात लाभार्थींना कमी वजनाचा शिधा, वेळेत शिधा देण्यास टाळाटाळ, लाभार्थींशी गैरवर्तन, अफरातफर असे अनेक प्रकार आढळून आले. दुकानदारांकडून पाच लाख नऊ हजार ७४० रुपये किमतीचे शिधाजिन्नस जप्त करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यात ६ लाख ३५ हजार १०८ शिधापत्रिकाधारक आहेत. यात अंत्योदय लाभार्थींची संख्या १२ हजार ६२७ तर प्राधान्य लाभार्थींची संख्या ६ लाख २२ हजार ४८१ आहे. शासन अंत्योदय शिधाधारकांना दरमहा प्रति शिधापत्रिकास ३५ किलो धान्य पुरवते. तर, प्राधान्य लाभार्थींना दरडोई पाच किलो धान्याचा पुरवठा केला जातो. ठरावीक हिश्श्याहून कमी धान्य देऊन फसवणूक केली जात असल्याचे आरोप लाभार्थींनी केले होते. शासन लाभार्थींना हक्काचा शिधा योग्य प्रमाणात पुरवत असले तरी दुकानदार कमी धान्य पुरवत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

हे ही वाचा…परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले

याबाबत जाब विचारल्यास शासनच कमी धान्य देत असल्याचे कारण शिधावाटप दुकानदार करीत असल्याचे लाभार्थींनी तक्रारीत म्हटले होते. या बेजबाबदार वर्तन, मनमानी आणि अन्नधान्य वितरणात अफरातफर, धान्याचे कमी वाटप, तर काही पात्र कार्डधारकांना अन्नधान्य दिल्या नसल्याच्या कारणाखाली ही कारवाई केल्याचे ‘फ’ परिमंडळचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांनी सांगितले. ठाणे, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, भाईंदरमधील नऊ दुकाने रद्द वा निलंबित करण्यात आली. शिवाय दुकानदारांकडून ३७ लाख ८२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

हे ही वाचा…भाजपच्या मुरबाडवर शिवसेनेचा दावा, शिवसेनेचे वामन म्हात्रे, सुभाष पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

अनेक लाभार्थ्यांना रेशन कमी मिळते, पावती मिळत नाही, काही दुकानदार दुकान उघडे ठेवण्याची वेळ पाळत नाहीत, मनमानी करत कोणत्याही वेळेला उघडतात आणि बंद करतात. धान्य असतानाही परत पाठवतात. याची तक्रार जर रेशन कार्डधारकांनी केली, त्याच दुकानाबाबत तक्रारींचे प्रमाण वाढल्यास पुरवठा विभाग त्या दुकानावर कारवाई करतात.

दुकानातील धान्य तपासणी केली जाते. महिनाभरात आलेले धान्य, वितरित धान्य यामध्ये दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाते. गंभीर दोष आणि सौम्य दोष लक्षात घेऊन दुकान रद्द किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येते. कमी वजनाचा शिधा, वेळेत शिधा देण्यास टाळाटाळ, अफरातफर असे प्रकार आढळले असून दुकानदारांकडून ५ लाखांचे जिन्नस जप्त करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine official ration shops suspended due to complaints of looting food grains from people shares sud 02