कल्याण – कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात पुना जोड रस्त्यावर शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान तयार सिमेंटचा गिलावा वाहून दोन रेडी मिक्सर वाहनांनी नऊ वाहनांना धडक देऊन चिरडले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण पूर्वेतील विजयनगर हा वर्दळीचा भाग. अपघात होत असताना या रस्त्यावर गर्दी कमी होती. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती, असे या भागातील व्यापाऱ्यांनी आणि प्रत्यदर्शींनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबद्दल दिलेली माहिती अशी, की विजयनगरमधील पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयासमोरून दोन रेडी मिक्सर वाहने पाठोपाठ उतारावरून चक्कीनाका भागात जात होती. उतारावर असताना एक रेडी मिक्सर वाहनाचा ब्रेक निकामी झाला. मागील रेडी मिक्सर वाहन चालकाला समोरील रेडी मिक्सर वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याचे समजताच, त्या वाहनाच्या चालकाने पुढील वाहनाला रोखण्यासाठी आपले वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत ब्रेक निकामी झालेला रेडी मिक्सर समोरील टेम्पोला जोरदार धडकला. त्यामुळे टेम्पो बाजुच्या झाडाला आणि दुकानांच्या समोरील भागाला धडकला.

टेम्पोला धडक बसल्याने टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पोची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी, रिक्षांना बसली. बेसावध टेम्पो चालक झाड आणि दुकानांना धडकल्याने टेम्पोमधील व्यक्ति चालकाच्या केबीनमध्ये चेमकला गेला. त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिक, पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना केबीनमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. ब्रेक निकामी झालेल्या रेडी मिक्सरला वाचविण्यासाठी पुढे आलेला रेडी मिक्सर रस्ता दुभाजकाला धडकला. या विचित्र अपघातामुळे विजयनगर भागातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली.

हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. त्यामुळे वाहन कोंडीत आणखी भर पडली. वाहतूक पोलिसांनी तातडीने हालचाली करून क्रेन बोलावून अपघातग्रस्त वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून बाजुला केली. रेडी मिक्सरच्या वाहनाच्या धडकेत चिरडलेली वाहने रस्त्यावरून क्रेनच्या साहाय्याने बाजुला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. ही वाहने बाजुला घेत असताना पु्न्हा या भागात कोंडी झाली होती. कोळसेवाडी पोलिसांनी या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोन्ही रेडी मिक्सर वाहन मालकांच्या चौकशीतून अपघात कोणत्या कारणामुळे झाला हे पुढे येईल. त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही जाईल, असे पोलिसांनी सांगितले. नुकसान झालेल्या वाहन चालकांनीही आपल्या वाहनाच्या भरपाईसाठी हालचाली सुरू केल्या होत्या.