निसर्ग उद्यान, पाटीलनगर, मांजली, बदलापूर (प)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक मोकळ्या जागा आता गृहसंकुलांनी व्यापल्या असून शहरात एक तर इमारत वा रस्ते अशा दोनच गोष्टी पाहायला मिळतात. मात्र शहरात आजही काही मैदाने नागरीकरणाच्या रेटय़ात तग धरून आहेत. त्यातीलच एक उद्यान म्हणजे निसर्ग उद्यान. मांजर्लीत असलेल्या या उद्यानाचे वय तसे लहानच. अगदी दशकभरापूर्वी हे उद्यान उभारण्यात आले. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निसर्गप्रेमाने या उद्यानाची प्रकृती उत्तम आहे. चिंचोळ्या किंवा आयताकृती अशा आकारात असलेले हे उद्यान मोठमोठय़ा इमारतींच्या अगदी मधोमध आहे. तसा आसपासचा परिसरही शांतच असल्याने ती शांती उद्यानातही अनुभवास मिळते. पहाटेच्या वेळी अनेक जण येथे व्यायाम करण्यासाठी येतात आणि नवी ऊर्जा घेऊन जाताना दिसतात. सायंकाळी दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी बरीच मंडळी येथे रेंगाळताना दिसतात. त्यामुळे पहाटे आणि सायंकाळपासून ते अगदी रात्री दहा वाजेपर्यंत इथे अनेक ज्येष्ठ, तरुण आणि लहानग्यांचा येथे वावर पाहावयास मिळतो.

निसर्ग उद्यान हे आजच्या घडीला मांजर्ली, बेलवली, मोहनानंद नगर, शनिनगर यांच्या वेशीवरील ते थेट गोविंदधाम परिसरापर्यंतच्या नागरिकांसाठी सर्वात पहिल्या पसंतीचे आहे. जवळची उद्याने सोडून नागरिक पहाटेपासूनच येथे येताना दिसतात. चिंचोळे असूनही विविध झाडांनी आणि छोटय़ा रोपटय़ांनी मैदानाचे सौंदर्य वाढवले आहे. फुलांच्या लहान मोठय़ा कुंडय़ांमुळे उद्यानात एक वेगळेच वातावरण तयार होते. शहरात असूनही शहरापासून लांब असल्याचा भास इथे निर्माण होतो. इतर उद्यानांच्या तुलनेत या उद्यानात उत्तम कौटुंबिक वातावरण पाहायला मिळते. अनेक ज्येष्ठ नागरिक एकमेकांच्या आरोग्याची विचारपूस करत येथे मॉर्निग वॉक करताना दिसतात. पहाटेच्या वेळी प्रसन्न वातावरणात शुद्ध हवा घेण्यासाठी येणाऱ्या तरुणांची तसेच महिलांची संख्याही लक्षणीय आहे. हल्ली गोळ्या-औषधांबरोबर निसर्ग सान्निध्यात चालण्याचा उपाय डॉक्टर मंडळी बऱ्याच रुग्णांना सुचवितात. त्यानुसार डॉक्टर आज्ञा प्रमाण मानून पथ्य म्हणून फिरायला येणारेही बरेच आहेत. ते आपापल्या सोयीने येथे विहार करीत असतात. एकूणच चालणे आणि निवांत गप्पा मारणे यासाठी या उद्यानाचा सर्वाधिक वापर होताना दिसतो. या उद्यानाला सहा फेऱ्या मारल्यानंतर एक किलोमीटरचा फेरा पूर्ण होतो, असे एक मोजमाप वापरले जाते. त्यामुळे आपण किती अंतर कापले याची माहितीही या उद्यानात आपल्याला मिळते. त्यामुळे स्वत:च्या आरोग्याबाबत निरिक्षणे नोंदवण्यासही मदत होत असल्याचे दिसते. याबाबत काही तरुण समाधान व्यक्त करतात. अनेक तरुणांच्या मते पैसे घालवून व्यायामशाळेत जाण्यापेक्षा अशा आनंददायी उद्यानात येऊन ज्येष्ठांच्या सान्निध्यात काही जुने प्रसंग आणि किस्से ऐकत वेळ घालविणे अधिक आरोग्यदायी आहे. उद्यानात बसण्याची व्यवस्थाही चांगली आहे. झाडांच्या सान्निध्यात थकल्यानंतर किंवा योगासनांसारखे प्रकार करण्यासाठी उत्तम व्यवस्था असल्याचे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात.

मॉर्निग वॉकसोबत येथे अनेक गप्पांचे फडही रंगलेले आपल्याला पाहायला मिळतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ते बदलापुरातील घरांच्या किमतींपर्यंत सर्वच विषयांवर येथे चर्चा होताना दिसते. महिलांच्या गप्पांचे फडही येथे रंगतात.

पहाटे आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळी येथे ज्येष्ठ नागरिकांचे अनेक गट आपल्याला पाहायला मिळतात. उद्यानात बदलापूर आणि आसपासच्या परिसरात आढळणारे प्राणी, पक्षी यांची माहिती छायाचित्रांसह देण्यात आली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील जैवविविधतेविषयीची माहिती उद्यानात येणाऱ्या नागरिकांना मिळते. त्यामुळे आरोग्यासह ज्ञानातही भर पडत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करतात, असे स्थानिक लोकप्रतिनिधी श्रीधर पाटील सांगतात.

भविष्यात येथे आणखी लोकोपयोगी उपक्रम राबवून उद्यान आदर्श करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते सांगतात. लवकरच उद्यानात इको जिमची सुविधा देण्यात येणार असून वॉकसोबत काही व्यायामाचे प्रकारही करता येणे शक्य होणार आहे.

चर्चेसाठी महत्त्वाचे ठिकाण

गेली आठ वर्षे मी या उद्यानात येतो. सध्या वयामुळे मॉर्निग वॉक हवा तसा करता येत नाही. मात्र जुन्या मित्रांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी इथे येता येते. त्यामुळे काही निवांत क्षण मिळतात. त्यामुळे छान, आनंदी वाटते.

चंद्रसेन भागवत, वय ८८.

दिवसाची चांगली सुरुवात

गेल्या काही दिवसांपासून मी इथे येण्यास सुरुवात केली आहे. पहाटेच्या वेळी शुद्ध हवा आणि प्रसन्न वातावरण मिळत असल्याने दिवसाची सुरुवात चांगली होते. इमारतींच्या जाळ्यात हे प्रसन्न क्षण मिळत असल्याने स्वत:ला नशीबवान समजतो.

सुजाता हळवे, गृहिणी.

छोटय़ात मोठा आनंद

उद्यानाचे क्षेत्रफळ त्या मानाने कमी आहे. मात्र त्यातही चांगली स्वच्छता, झाडे आणि फुलांच्या रोपांमुळे शुद्ध हवा मिळते. सायंकाळच्या वेळीही येथे बसण्यासाठी चांगले वातावरण असते. त्यामुळे एक कौटुंबिक समूह तयार झाला आहे. त्यामुळे सुख-दु:ख वाटून घेतले जात असल्याने आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही उत्तम राहते.

सुलभा बिजीतकर, गृहिणी.

व्यायामाची साधने मिळावीत

दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी इथे उत्तम सोय आहे. प्रसन्न वातावरण आणि उद्यानातील स्वच्छतेमुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे उद्यानाचा चांगला फायदा होतो. येथे हलक्या-फुलक्या व्यायामाची सुविधा उपलब्ध झाल्यास उत्तम ठरेल.

 श्रीराम घोलप

गर्दीतही शांत ठिकाण

उद्यानाच्या अवतीभवती मोठय़ा प्रमाणावर गृहसंकुले वाढली आहेत, मात्र तरीही येथे असणारी शांतता ही मनाला सुखावून जाते. चांगल्या वातावरणात मोकळेपणाने फिरता येते. उद्यानात फिरताना निसर्गाच्या सान्निध्यात फिरत असल्याचा अनुभव इथे मिळतो.

– स्नेहा साळे

प्रसन्न आणि सुरक्षित वातावरण

मी उद्यानापासून लांब राहते. माझ्या घराशेजारीही उद्यान आहे. मात्र तेथील वातावरण प्रसन्न आणि सुरक्षित वाटत नसल्याने मी या उद्यानात मॉर्निग वॉकसाठी येत असते. ज्येष्ठांची उपस्थिती आणि सहवास असल्याने एका कौटुंबिकवातावरणात पहाटेची चांगली सुरुवात होते.

– रुतिका भालेराव