कागदाचा वापर लिखाणापुरता किंवा शासकीय कार्यालयातील लेखाजोखा करण्यापुरता मर्यादित असल्याचे आपण अनुभवत असतो. परंतु कागदाच्या या मर्यादित वापराला कल्याणच्या नितीश लाड या तरुणाने तडा देऊन कागदाचा कल्पकतेने वापर करून विविध शिल्पे साकारली आहेत. वांद्रे-वरळी सी-लिंक, गेट वे ऑफ इंडिया, आयफेल टॉवर यांसारख्या जगप्रसिद्ध वास्तूंचीही त्याने कागदी निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या कलाकृतीची दखल लिम्का बुकनेही घेतली आहे. सध्या नितीश ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान पटकाविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
बीएस्सी करत असताना तृतीय वर्षांत विद्यापीठाच्या चुकीमुळे तो अनुत्तीर्ण झाला आणि त्याचे एक वर्ष वाया गेले. पण हे वर्ष फुकट न घालविता त्याने पुन्हा आपली कला जोपासली आणि कागदाच्या छोटय़ा-छोटय़ा वस्तू बनविण्यास सुरुवात केली. पुढे त्याने तीन महिने अथक मेहनत करून ‘गेटवे ऑफ इंडिया’ची कागदी प्रतिकृती साकारली. कागदाच्या साहाय्याने काही बनविता येणार नाही, असे अनेकांनी नितीशला सुरुवातीच्या काळात सांगितले; परंतु त्याने तीन-चार दिवस जागरण करून अवघ्या १७ तासांमध्ये वांद्रे-वरळी सी-लिंकची प्रतिकृती साकारली. विशेष म्हणजे या प्रतिकृतीमध्ये रंगीत दिव्यांचा वापर नितीशने केला. आतापर्यंत ओरिगामी, क्विलिंग यांच्या प्रतिकृतीही त्याने साकारल्या आहेत. मध्यंतरी मेक्सिको येथून महाविद्यालयात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी त्याने कागदाच्या भेटवस्तूही तयार केल्या होत्या. नितीश एकटाच काम करत असल्यामुळे आणि मोठी शिल्पे (मॉन्युमेंट्स) बनविण्यासाठी आवश्यक उपकरण उपलब्ध नसल्याने ही कला छंदापुरतीच मर्यादित असल्याचे नितीश सांगतो.