वेदिका कंटे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : नितीन देसाई खूप खंबीर होते. कामाच्या बाबतीत ते नेहमी उत्साही असत. हाती आलेला प्रत्येक प्रकल्प ते आव्हान म्हणून स्विकारत होते. लालबागचा देखावा यावर्षी ते करणार होते. अनेक प्रकल्पही त्यांच्या हाती होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना एका कार्यक्रमात भेटलो होतो. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही नैराश्य नव्हते. त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल उचलले याबाबत विश्वास बसत नाही, असे नितीन देसाई यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि कला दिग्दर्शक संजय धबडे म्हणाले.

हेही वाचा >>> नितीन देसाईंनी लालबागच्या राजासाठी उभारलेला मंडप ठरला शेवटचा! ९०व्या वर्षासाठी होता खूप उत्साह, Photos पाहा

नितीन देसाई आणि संजय धबडे यांनी अनेक प्रकल्प एकत्र केले आहेत. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या प्रकल्पात नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली धबडे यांनी सहकलादिग्दर्शक म्हणून काम केले होते. सुमारे तीन ते चार वर्ष हे काम केले. धबडे यांनी देसाई यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. देसाई यांच्या कामाची पद्धत वेगळी होती. त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणासोबत ‘शाही लग्नसोहळे’ आयोजित करण्यात येत होते. त्यामध्ये त्यांना आणखी बदल करून मोठे काहीतरी करायचे होते. त्यांच्यासोबत चर्चा करत असताना अनेकदा ते याबाबतीत मला सांगायचे. या प्रकल्पात मला त्यांच्यासोबत काम करायचे होते, हे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे धबडे म्हणाले.

हेही वाचा >>> ‘तमस’ ते ‘कौन बनेगा करोडपती’… कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या कलेची जंत्री…

आमच्या क्षेत्रामध्ये अनेकांना आर्थिक तणाव येत असतात. त्याला खंबीरपणे उत्तरे द्यावी लागतात. नितीन देसाई हे आमच्यासाठी खंबीर व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही नैराश्य नव्हते. त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल उचलले याबाबत विश्वास बसत नाही. लालबागचा राजाच्या देखाव्याचे काम नितीन करत होते. काही दिवसांपूर्वीच ते बैठकीला उपस्थित होते. लालबागच्या राजाचा देखाव्याचे काम श्रद्धा म्हणून करत होते, असे धबडे म्हणाले.

चौकट नितीन यांच्यासोबत काम करताना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांना ऐतिहासिक ‘सेट’ बनावयला आवडत असे. कोणताही सेट बनविताना ते हातात रंगाचा ब्रश घेऊन असायचे. त्यामुळे सेट तयार करताना त्याचे कपडे नेहमी रंगाने माखलेले असायचे. एखाद्या मालिकेच्या भागासाठी नवा सेट उभारायचा असेल तर ते जुना सेट एका रात्रीत बदलून दाखवत होते, असे धबडे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin desai very close friend and art director sanjay dabade reaction on suicide zws