डोंबिवली– नवी मुंबई परिवहन सेवेच्या बस चालक आणि वाहकाला डोंबिवलीतील दुचाकीवरील दोन जणांनी बुधवारी संध्याकाळी एमआयडीसीतील विको नाका भागात बेदम मारहाण केली. चालकाच्या तक्रारीवरुन मोटार चालक आणि त्याच्या सहकाऱ्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. नवी मुंबई परिवहन सेवेचे बस चालक उमाशंकर गौंड (५१, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांनी ही तक्रार केली आहे. गौंड, वाहक हरी गायकवाड यांना डोंबिवलीतील एमएच-०५-एफडी-८५१६ दुचाकीवरील चालक, सहकाऱ्यांनी मारहाण केली.
हेही वाचा >>> फलाट सोडून लोकल निघाली पुढे; विठ्ठलवाडी स्थानकातील घटना, प्रवाशांची तारांबळ
पोलिसांनी सांगितले, नवी मुंबईतील तुर्भे बस आगारातून नवी मुंबई परिवहन बस सेवेची नवी मुंबई-डोंबिवली बस घेऊन चालक गौंड, वाहक गायकवाड डोंबिवलीत प्रवासी घेऊन येत होते. कल्याण-शिळफाटा रस्त्याने बस एमआयडीसीतील सुयोग हाॅटेल विको नाका भागातून डोंबिवलीत प्रवेश करत होते. त्यावेळी या बसच्या बाजुने दुचाकी स्वार चालले होते. आरोपींची दुचाकी रस्त्याच्या कडेला गेली. बस चालकाच्या चुकीमुळे आपण रस्त्याच्या बाजुला गेलो असा गैरसमज करुन दुचाकीवरुन चालक, त्याच्या सहकाऱ्यांनी पहिले चालक गौड, मग वाहक गायकवाड यांना बेदम मारहाण केली. शिळफाटा रस्त्याने दुचाकी चालविताना बहुतांशी दुचाकी स्वार रस्त्याच्याकडेने, चारचाकी वाहनांच्या समतल दुचाकी चालवून वाहतूक कोंडीत भर घालतात.