* ‘एकलव्य’ पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा निर्णय  * फटाक्यांचे पैसे विधायक कार्यासाठी
दिवाळी सणानिमित्ताने वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांचे दुष्परिणाम समोर येऊ लागल्याने समता विचार प्रसारक संस्थेच्या एकलव्यांनी यापुढे फटाक्यांची खरेदी करायची नाही, असा निर्णय नुकत्याच एका कार्यक्रमात घेतला आहे. या निर्णयामुळे फटाके खरेदीसाठी वापर होणाऱ्या पैशांची बचत होणार असून त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी सोडला.
गेल्या काही वर्षांपासून दिवाळी सणानिमित्ताने बाजारामध्ये मोठय़ा आवाजाचे फटाके विक्रीसाठी येऊ लागले आहेत. असे फटाके वाजवून अनेकजण दिवाळी साजरी करण्यास प्राधान्य देतात. मोठय़ा आवाजाचे तसेच अन्य फटाक्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी काही सामाजिक संस्था जनजागृती करीत असून यातूनच फाटकेविरहित दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकजण पुढे येत असल्याचे चित्र आहे. समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने दरवर्षी एकलव्य पुरस्कार देण्यात येतो. घरातील आर्थिक परिस्थितीवर मात करत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. या विद्यार्थ्यांसाठी संस्थेमार्फत वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. त्याचा एक भाग म्हणून दिवाळी सुट्टीत संस्थेने अवकाश निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ठाणे येथील येऊर भागात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या वंदना शिंदे यांनी फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. फटाके वाजविल्याने त्याचे काय परिणाम होतात याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. या सादरीकरणानंतर यावर्षी तसेच यापुढे कधीही फटाके विकत घेणार नाही आणि त्यामुळे बचत होणाऱ्या पैशांचा उपयोग काही तरी चांगल्या कामासाठी करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी यापुढे फटाक्यांची खरेदी करायची नाही, असा निर्णय घेत पैशांच्या सदुपयोगाचा संकल्प यावेळी सोडला. या कार्यक्रमास सुमारे ६० ते ७० एकलव्य विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जगदीश खैरालिया यांनी दिली.
खगोलशास्त्र आणि अवकाश निरीक्षण
या कार्यक्रमात प्रा. प्रकाश पारखे आणि वंदना शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक आणि अत्यंत ओघवत्या सोप्या भाषेत खगोलशास्त्रासारखा जटिल विषय समाजावून सांगितला आणि  मुलांच्या मनातील अनेक समज-गैरसमज दूर केले. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी अस्तित्वात आली, नक्षत्रांची माहिती, वार, महिने, राशी यांचा उगम कुठून झाला, अशी माहिती दिल्याचे खैरालिया यांनी सांगितले.

Story img Loader