२०१५च्या रेल्वे अर्थसंकल्पात ४२८ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद; प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात नाही
कल्याण-वाशीदरम्यान थेट प्रवासासाठी रेल्वे वाहतूक सुरू करण्याची गेल्या रेल्वे अर्थसंकल्पातील घोषणा वर्षभर कागदावरच राहिल्याचे चित्र असून या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामाची कोणतीही हालचाल अद्याप सुरू झालेली नाही. ठाणे-वाशी रेल्वे मार्गानंतर कल्याण-वाशी अशी रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी कळव्यातून थेट ऐरोलीकडे उन्नत मार्गाने हा रेल्वे मार्ग जोडला जाणार आहे. यासंबंधीचे आवश्यक सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. वर्षभरापूर्वी सादर झालेल्या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गासाठी ४२८ कोटी रुपयांची तरतूद करून प्रवाशांना सुखद धक्काही दिला होता. त्यामुळे हे काम कधी सुरू होईल या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांच्या पदरी वर्षभरात निशाराच पडली आहे. या कामाची केवळ अर्थिक तरतूद करण्यातच संपूर्ण वर्ष गेले आहे. त्यामुळे २०१८ पर्यंत कल्याण-वाशी मार्ग पूर्ण होण्याची शक्यता धूसर बनू लागली आहे.
लोकलच्या गर्दीमुळे घुसमटलेला रेल्वे प्रवासी दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईसाठी नेमके काय मिळते आहे याकडे डोळे लावून असतो. २०१५मध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कल्याण-वाशी मार्गाला हिरवा कंदील दाखवला. रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा झाल्याने काम काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येईल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र या घोषणेला वर्ष पूर्ण झाले आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये नवा अर्थसंकल्प सादर होणार असून मागील घोषणेला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या भागातून नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच मोठी आहे. हे प्रवासी ठाण्याहून ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईत येजा करत असतात. ठाणे स्थानकावर त्यामुळे प्रवाशांचा मोठा ताण येत असतो. ठाणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी कळवा-ऐरोली उन्नत मार्गाचा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकणार आहे. हे काम २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे सध्याच्या गोंधळावरून स्पष्ट होऊ लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा