उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेत २५ हजार पदांची भरती, ५५ हजार रूपये पगार अशा आशयाचे संदेश गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर शहरात विविध समाज माध्यमांतून प्रसारीत होत होते. मात्र हे संदेश बनावट असल्याचे आता समोर आले आहे. उल्हासनगर महापालिकेत कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू नसून नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये अशी जाहिरातच पालिका प्रशासनाला करावी लागली आहे. फसवणूक टळावी यासाठी जाहिरात दिल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
उल्हासनगर महापालिकेत नोकर भरती सुरू असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर महापालिकेत मोठी भरती सुरू असल्याचे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित केले जात होते. उल्हासनगर महापालिकेत २५ हजार पदांची भरती, ५५ हजार रूपये पगार अशा आशयाचे हे संदेश होते. या संदेशांमध्ये एका संकेतस्थळाचे नावही समाविष्ट होते. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेत इच्छुकांकडून विचारणा सुरू झाली होती. अनेकांनी दलालांच्या माध्यमातून नोकरीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी पालिकेत वशीलाबाजी करण्यासाठी अधिकांऱ्यांना विनंती केली जाऊ लागली होती. मात्र अशा कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू नसल्याची वेळ पालिकेवर आली.
काही इच्छुकांनी काही व्यक्तींच्या माध्यमातून अर्ज भरल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सर्वसामान्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी उल्हासनगर महापालिकेने याची जाहिरात देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवडे यांनी दिली आहे. www.sikhosikhao.in/Ulhasnagar-mahanagar-bharati या संकेतस्थळाचे नाव देऊन ही जाहिरात दिली जात असल्याची माहिती अशोक नाईकवडे यांनी दिली आहे. कुणाचीही फसवणूक होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनाही याप्रकरणाची माहिती दिल्याचे नाईकवडे यांनी सांगितले आहे. उल्हासनगर महापालिकेतील एकूण कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध ३ हजार २५३ इतका आहे. त्यामुळे २५ हजार भरती अशक्य असून नागरिकांनी अशा कोणत्याही बनावट संदेशांना बळी पडू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नोकर भरतीबाबत संदेश समाजमाध्यांवर प्रसारित केले जात होते. नागरिकांची फसवणूक होऊ शकते यामुळे प्रशासनाने जाहिरात देऊन सतर्क केले आहे.