ठाणे रेल्वेस्थानकातील फलाटांवर छत नसल्याने प्रवाशांचे हाल
सोसाटय़ाच्या वाऱ्याबरोबर जोरदार पावसाचे आगमन होते. ठाणे रेल्वे स्थानकाच्या सॅटीसखालील सर्व फेरीवाले आपापले सामान गोळा करून फलाटाच्या दिशेने धाव घेतात आणि फलाट क्रमांक दोनवर चक्क बाकडे ठेवून पुन्हा विक्री करण्यास सुरुवात करतात. मात्र गाडीची वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशांना त्या गळक्या छताखाली भिजत उभे राहवे लागते. त्यामुळे हे ‘छत्र’ नेमके कुणासाठी असा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागला आहे. ठाणे रेल्वे स्थानकांची पावसाळ्यापूर्वीची छत देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण होऊ शकली नसल्याने पावसाने रेल्वे प्रवाशांना मोठा तडाखा दिला असून सकाळी कामावर निघणाऱ्या प्रवाशांची या पावसामुळे पुरती तारांबळ उडू लागली आहे. धो-धो पावसामध्ये स्थानकात उतरल्यावर गळक्या स्थानकात कुठे आसरा घ्यायचा, असा प्रश्न प्रवाशांना पडू लागला आहे.
सरकत्या जिन्याच्या अगदी समोरील पायऱ्यांच्या जिन्यामधील, फलाटावरील आणि रेल्वे पुलावरील परिस्थिती बिकट आहे. या भागात वाकडेतिकडे पत्रे बसवण्यात आले असून फुटलेले, छिद्रे पडलेले पत्रे, मोडलेल्या पाईपमधून धो-धो पडणारे पाणी प्रवाशांना अखंड स्नानच घालत आहेत. गाडीच्या दारावरच पत्र्यावरील पाण्याच्या धारा सुरू असून त्यामुळे चढणारे आणि उतरणारे प्रवासी पूर्णपणे भिजतात. ठाणे स्थानकातील एका पादचारी पुलावर चक्क पत्रेच नसल्याने येथून जाणाऱ्या प्रवाशांना छत्री उघडल्याशिवाय पावसातून चालणेच शक्य होत नाही. छतांच्या पत्र्यांची डागडुजी करताना कामचुकारपणा केल्याचा प्रवाशांना फटका बसला असून त्यामुळे परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करू लागले आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करूनही येथील परिस्थिती काही बदलेली दिसून येत नाही. अतिक्रमण विभागाची गाडी समोर उभी असली तरीही फेरीवाले जागचे हलत नाहीत. यावरून फेरीवल्यांवर कोणाचे ‘छत्र’ आहे हे स्पष्ट दिसून येते.
या फेरीवाल्यांवर चाप बसावा यासाठी येथे काही कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. गळ्यात आतिक्रमण खात्याचे ओळखपत्र अडकवून ही मंडळी एका कोपऱ्यात चकाटय़ा पिटताना दिसून येतात. पावसाची जोरदार सर येताच हे फेरीवाले आपल्या सामानाबरोबर रेल्वे फलाटकडे धाव घेतात आणि पाऊस थांबेपर्यंत तेथेच ठाण मांडून बसतात. हा सर्व प्रकार रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यादेखत होत असला तरीही याकडे कानाडोळा केला जातो, असे प्रवासी सांगतात.