ठाणे जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठय़ाच्या नियोजनासाठी लघु पाटबंधारे विभागाने ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने दर बुधवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने ठाणेकरांवर पाणी संकट ओढवले असले, तरी येत्या बुधवारी मात्र पाणीपुरवठा सुरूच राहील, अशी घोषणा मंगळवारी महापालिकेकडून करण्यात आली.

यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जिल्ह्य़ातील धरणे अद्याप भरलेली नाहीत. या धरणांतील पाणी उल्हास नदीच्या पात्रातून उचलण्यात येते आणि विविध स्रोतांमार्फत शहरांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येतो. उल्हास नदीतील पाणी साठय़ाचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यापासून सुमारे १४ टक्के कपात लागू करण्यात येते. यंदा पावसाने दडी मारल्याने उल्हास नदीतील पाणी साठय़ाच्या नियोजनाकरिता कोपरी येथील पाटबंधारे विभागाने ३० टक्के कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कपातीमुळे ठाणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने दर बुधवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कपातीमुळे ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना व स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे दर बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे घोडबंदर रोड परिसर, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, घोडबंदर रोड, सिद्धेश्वर, ऋतू पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई, खारटन रोड, वसंतविहार आदी परिसराचा पाणीपुरवठा बुधवार सकाळपासून ते गुरुवारी सकाळपर्यंत असा २४ तास बंद राहणार आहे. असे असले तरी येत्या बुधवारी ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना व स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेने येत्या बुधवारी शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Story img Loader