डोंबिवली – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे कल्याण तालुक्यातील जांभुळ येथील जलशुध्दीकरण केंद्र, बारवी गुरुत्व वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हाती घेतले जाणार आहे. या चोवीस तासाच्या कालावधीत दुरुस्तीच्या कामासाठी या जलशुध्दीकरण केंद्र आणि गुरुत्व वाहिनीतून कल्याण डोंबिवली पालिका, उल्हासनगर शहर, डोंंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील ग्रामपंचायतींना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.
या पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत जांभुळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्व वाहिनीतून परिसरातील शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांंमधील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. बारवी गुरुत्व वाहिनी, जांभुळ जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण डोंबिवली पालिका हद्दीचा काही भाग, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, २७ गाव परिसराला दररोज पाणी पुरवठा केला जातो. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ असा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवासी, औद्योगिक विभागातील उदयोजकांनी एक दिवस पुरले इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.