ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ कचरा अडकल्याने महापालिकेला पुरेशा प्रमाणात पाणी उचलणे शक्य होत नसून हा कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंदिरानगर संप येथील जलवाहीनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने बुधवारी शहराच्या काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील- भास्कर जाधव
हेही वाचा : तीन वर्ष उलटुनही प्रतिनियुक्तीवरील शहर अभियंतांचा कल्याण-डोंबिवलीत मुक्काम
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २१० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून हा स्त्रोत महत्वाचा मानला जातो. या योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रातील पिसे बंधाऱ्यातून पाणी उपसा करते. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भातसा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यासोबत गाळ आणि कचरा वाहून आला असून तो ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरील पंपाच्या मुखाशी अडकला आहे. यामुळे पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नसल्यामुळे पंपाच्या मुखाशी अडकलेला कचरा आणि गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे बुधवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांसाठी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. त्याचबरोबर इंदिरानगर संप येथील जलवाहीनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे इंदिरानगर संपवरून पाणी पुरवठा होणाऱ्या इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर या भागांचा पाणी पुरवठा बुधवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पुर्णपणे बंद राहिल. या बंदमुळे पाणी पुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिकेने दिली.