अंबरनाथ : ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणाच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात नियोजित असलेल्या तांत्रिक कामांसाठी येत्या शुक्रवारी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना आणि औद्योगिक वसाहतींनी होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २७ जानेवारी रोजी बंद असणार आहे. २४ तास पाणी पुरवठा बंद असल्याने त्याच्या दुसऱ्या दिवशीही पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील उन्नतीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामासाठी मार्च आणि एप्रिल महिन्यातही काम केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरे, ग्रामीण भाग आणि औद्योगिक वसाहतींनी बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बारवी धरणातून बारवी नदीद्वारे येणारे पाणी अंबरनाथजवळच्या जांभूळ येथे उल्हास नदीला मिळते. येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते. पुढे ते भव्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून बदलापूर, अंबरनाथ, अति. अंबरनाथ, डोंबिवली, टी.टी.सी., ठाणे, तळोजा औद्योगिक क्षेत्र तसेच बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, नगरपालिका, महानगरपालिका आणि परिसरातील इतर ग्रामपंचायतींना पुरवले जाते. या केंद्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ जलशुद्धी केंद्रातील यंत्रणेच्या उन्नतीकरण आणि मजबुतीकरणाची कामे हाती घेतलेली आहेत. यापैकी प्रथम टप्प्याच्या कामातील काही जोडण्या करण्याकरीता शुक्रवार, २७ जानेवारी रोजी जलशुद्धीकरण केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी ज्या औद्योगिक वसाहती आणि शहरांना तसेच ग्रामीण भागाला पाणी पुरवठा होतो तो रात्री १२ वाजल्यापासून २४ तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे २७ जानेवारी रोजी पाणी पुरवठा बंद असले, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

हेही वाचा – कल्याणमध्ये व्यावसायिकाकडून रिक्षा चालकाला मारहाण

हेही वाचा – ठाणे : तडीपार आरोपी अटकेत, भिवंडी पोलिसांची कारवाई

या कामातील पुढच्या टप्प्यातील काही कामे येत्या १० मार्च आणि १४ एप्रिल रोजी केली जातील. त्यामुळे या दिवशीही पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन एमआयडीसीतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी यानुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहनही एमआयडीसी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water in thane district on friday water supply stopped due to technical works at jambhul water treatment plant ssb