लोकसभेनंतर विधानसभेतही नागरिकांचे आंदोलन
एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बदलापूर शहरात पाणीटंचाई होती. त्यामुळे शहरातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांनी पाणी नाही, तर मत नाही ही मोहीम चालवली होती. असे असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर बदलापूर पश्चिमेतील काही भागांत पाण्याची टंचाई असल्याने १० ते १२ रहिवासी संकुलांनी मतदानात सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. शहरात विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना भरपूर पाऊस पडूनही अनेक भागांत पाणीटंचाई असल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे.
बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा बॅरेज बंधारा येथून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करणारे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू असते. तरीही वाढत्या शहराला पाणीपुरवठा करण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला यश येताना दिसत नाही. याबाबत सातत्याने विविध आंदोलने नागरिक करतात. मात्र या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मे महिन्यात बदलापूर शहरात पाणीटंचाईचे सावट होते. त्यामुळे बदलापूर पूर्वेतील कात्रप, शिरगाव भागातील नागरिकांनी आपल्या इमारतींच्या प्रवेशद्वारावर पाणी नाही तर मत नाही अशा आशयाचे बॅनर झळकवत उमेदवारांना प्रचार बंदी करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यांत बदलापूर शहरात दोन वेळा पूर आला एवढा मोठा पाऊस झाला. यंदाच्या मोसमात बदलापूर, अंबरनाथ पट्टय़ात विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच जलसाठे भरले आहेत. मात्र त्यानंतरही बदलापूर पश्चिमेतील विविध भागांत पाणीटंचाईचे चित्र आहे. पश्चिमेतील मांजर्ली भागात असलेल्या त्रिमूर्ती रेसिडेन्सी आणि आसपासच्या रहिवासी संकुलांनी पाणी प्रश्न आणि इतर पायाभूत सुविधांसाठी मतदान करायचे नाही असा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे बॅनर नागरिकांनी आपल्या संकुलांच्या प्रवेशद्वारावर लावले आहेत. आमच्या प्रभागात यंदाच्या वर्षांत दोनदा पुराचा फटका बसला. त्यामुळे आमची पुरती वाताहत झाली. त्यासोबत आमच्या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ऐन सण उत्सवात पाण्याची व्यवस्था करायची कशी असा प्रश्न कायम सतावत असतो, अशी प्रतिक्रिया येथील महिला देत आहेत. तर सोसायटीच्या आसपास योग्यरीत्या स्वच्छता केली जात नाही. आमच्या तक्रारी प्राधान्याने सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे पाणी नाही, स्वच्छता नाही तर मतदानही नाही, अशी भूमिका येथील रहिवाशांनी घेतली आहे.
नोटाचा प्रचार जोमाने
सुविधा नाही तर मतदान करायचे कुणाला आणि करायचेच झाले तर आमच्या समस्या सोडवू शकणारा उमेदवार नाही. त्यामुळे नोटाला मतदान करू, अशा प्रतिक्रिया बदलापुरातील विविध ठिकाणचे मतदार देत आहेत. समाजमाध्यमांवर नोटाची मोहीम जोर धरताना दिसत आहेत.