लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथः अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. येथील पाणपोई, स्वच्छतागृह आणि सर्वच पाण्याच्या नळांना पाणी येत नसल्याने प्रवाशांची कोंडी होते आहे. उष्णता वाढल्याने आधीच घामाघूम होत असलेल्या प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडते आहे. पिण्यासाठी बाटलीबंद पाण्याचाच पर्याय प्रवाशांपुढे उरला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकात गेल्या काही वर्षात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जवळपास सर्वच लोकलगाड्या येथून भरून जात असतात. त्यामुळे स्थानकातील सुविधांवर ताण येतो आहे. स्थानकातील बदलापूर दिशेला असलेल्या पादचारी पुलाच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रेल्वेच्या पादचारी पुलावरून द्रविडी प्राणायम करून येजा करावी लागते आहे. दुसरीकडे उष्णता वाढल्याने रेल्वे स्थानकातील प्रवासी घामाघुम होत आहेत. अशावेळी उष्माघात टाळण्यासाठी वारंवार पाणी पिणे, शरीर सामान्य तापमानाला ठेवण्यासाठी पाण्याने तोंड धुणे याला प्रवासी प्राधान्य देतात. मात्र अंबरनाथ रेल्वे स्थानकात ऐन उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतो आहे. स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर असलेल्या स्वच्छतागृहात दुपारनंतर पाणी गायब होत असते. सोबतच स्थानकात असलेले पिण्याच्या पाण्याचे नळ आणि पाणपोई अशा दोन्ही ठिकाणी पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. स्थानकात पिण्याचे पाणी नसल्याने प्रवाशांना बाटलीबंद पाण्यावर अवलंबून रहावे लागते आहे. घामाघुम झालेला चेहरा धुण्यासाठीही प्रवाशांना बाटलीबंद पाणी घ्यावे लागत असल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.

आणखी वाचा- Zero Shadow Day : सावली सोडणार साथ! ठाणेकरांना अनुभवता येणार शून्य सावली दिवस, पण कसं? कुठे?, जाणून घ्या

तर स्वच्छतागृहात पाणी नसल्याने दुर्गंधी वाढत असून त्यामुळे प्रवाशांना नाक दाबून स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो आहे. पाण्याअभावी महिला प्रवाशांचे हाल सुरू असून त्यांची कुचंबना होते आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होते आहे.

स्थानकाला अपुरा पाणी पुरवठा

अंबरनाथ रेल्वे स्थानकात होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. त्यामुळे स्थानकात दररोज दोन पाण्याचे टँकर पुरवले जातात अशी माहिती स्थानक प्रशासनाने दिली आहे. मात्र हाही पाणी पुरवठा अपुरा होत आहे. स्थानकात देण्यात आलेली जलवाहिनी स्थानकाबाहेर तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्याखाली गाडली गेली आहे. त्यामुळे आता नव्याने पाणी जोडणी द्यावी लागणार असून येत्या दोन ते तीन दिवसात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती स्थानक प्रशासनाने दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water supply in ambernath railway station mrj
Show comments