ठाणे: घोडबंदर येथील आनंदनगर भागात जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून या कामाच्या पार्श्वभूमीवर आनंदनगर आणि कासारवडवली भागाचा पाणी पुरवठा उद्या, मंगळवारी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे येथील गृहसंकुलांमधील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्ते नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. अशाचप्रकारे घोडबंदर येथील आनंदनगर भागातील चिल्ड्र ट्रॉफिक पार्क ते न्यू होरायझन स्कूलपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामामध्ये परिसराला पाणी पुरवठा करणारी ४५० ते ३०० मीमी व्यासाची जलवाहीनी बाधित होत आहे. ही जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे परिसराचा पाणी पुरवठा मंगळवार, ९ जानेवारी रोजी सकाळी ११ ते बुधवार १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे.
हेही वाचा… डोंबिवलीत गृहसेविकेने चोरलेले १० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
घोडबंदर येथील आनंदनगर भागातील कासारवडवली गाव (काही भाग), एव्हरेस्ट वर्ल्ड संकुल, यशराज पार्क संकुल, होरायझन हाईट संकुल, क्रिष्णा ग्रीन लँड पार्क संकुल, विजयपार्क संकुल, राम मंदिर रोड परिसरातील गृहसंकुले, भवानीनगर आणि ट्रॉफिक पार्क जलकुंभावरील उन्नती वुड संकुल, ट्रॉपीकल लगुन संकुल, विजय विलास संकुल, वाघबीळ जुना गाव, स्वस्तिक रेसीडेन्सी संकुल, हिल स्प्रिंग संकुल, सर्व्हिस रोड ते कासारवडवली नाका सर्व्हिस रोड लगतचा परिसर या भागांचा पाणीपुरवठा चोवीस तासासाठी पुर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.
सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.