ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत असलेल्या स्टेम प्राधिकरण आणि महापालिकेच्या स्वत:च्या पाणी योजनेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामामुळे ठाणे, घोडबंदर, कळवा या भागांचा पाणी पुरवठा उद्या (शुक्रवारी) बंद राहणार असून या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या २८ लाखांच्या घरात गेली असून वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्याने ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. अशाचप्रकारे येत्या शुक्रवारीही ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून पाणी योजनेमधील देखभाल, दुरुस्ती करणे आणि पिंपळास येथे शुद्ध पाणी वाहून नेणारी १५३० मीमी व्यासाच्या जलवाहीनीवर गळती थांबविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच महापालिका स्वत:च्या योजनेतील पिसे आणि टेमघर शुध्दीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्र आणि पंपिग यंत्रणेच्या देखभाल, दुरूस्ती व इतर तातडीचे कामे करणार आहे.
हे ही वाचा… कल्याण, मुरबाड येथे वीज पडून तीन जणांचा मृत्यू
हे ही वाचा… अपहृत मुलाची १२ तासांत सुटका, अंबरनाथ पोलिसांची कामगिरी; दहा आरोपी अटकेत
या दोन्ही कामासाठी शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते शनिवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ यावेळेत स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागांचा समावेश आहे. या बंदमुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.