कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेचा पाणी देयक, मालमत्ता कर थकविलेल्या, मालमत्ता कर न लावलेल्या आणि ज्या चाळ, इमारतींना सदनिकांच्या प्रमाणात नळजोडण्या नाहीत. अशा सर्व मालमत्तांना कल्याण डोंबिवली पालिकेकडून मोफत टँकरव्दारे करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात गेल्या अनेक वर्षापासून २५ ते ३० टँकर पालिकेच्या माध्यमातून मोफत टँकरने पाणी पुरवठा करतात. पाणी टंचाई असलेल्या झोपडपट्टी, चाळी भागात हा मोफत टँकरने पाणी पुरवठा करण्याचा आदेश असताना टँकर चालक, नगरसेवक आणि अधिकारी यांच्या संगनमताने आपली मतपेटी सुरक्षित राहण्यासाठी मुबलक पाणी पुरवठा होणाऱ्या सोसायटी, चाळी भागात टँकर चालक पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येणार नाही अशा पध्दतीने चोरुन पाणी पुरवठा करतात. या माध्यमातून पालिकेचे दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात.

विशिष्ट टँकर लाॅबी पालिकेत अनेक वर्षापासून सक्रिय आहे. या लाॅबीचे उखळ भरेल अशी व्यवस्था यापुर्वीच्या अधिकाऱ्यांनी करुन ठेवण्यात आली आहे. तीच व्यवस्था आता सुरू आहे. आता पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. अनावश्यक खर्चांवर निर्बंध टाकण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. यावेळी प्रशासनाच्या मोफत टँकरच्या माध्यमातून उधळपट्टी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सरसकट कोणालाही मोफत टँकर न देण्याचे आदेश काढले आहेत.

हेही वाचा : ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी , नाराजीच्या वातावरणात खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

ज्या चाळी, सोसायट्यांनी पालिकेचा पाणी, मालमत्ता कर थकविला असेल, इमारती, चाळीतील खोल्यांच्या प्रमाणात नळ जोडण्या नसतील, ज्या मालमत्तांना पालिकेकडून कर लागलेला नाही अशा ठिकाणी मोफत टँकर देण्यात येऊ नयेत. यासाठी संबंधित विभागांकडून ना हरकत दाखले घेण्यात यावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचा : ठाणे शहरात आजपासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाला सुरुवात

टँकर चालक कमाई

पालिकेच्या रामचंद्र नगर किंवा जयहिंद काॅलनीतील जलकुंभांवर टँकर भरल्यानंतर सुरुवातीला टँकर चालक पाणी पुरवठा विभागाकडून आलेल्या पावत्यांप्रमाणे टँकरचा सोसायट्यांना प्राधान्याने पाणी पुरवठा करतात. त्यानंतर ते नगरसेवकांनी सूचित केलेल्या सोसायट्यांना पाणी पुरवठा करतात. आणि पालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन पाण्याची गरज असलेल्या सोसायट्यांनी बाराशे रुपयांना टँकर पुरवतात. शहराच्या विविध भागात मुबलक पाणी पुरवठा होत असताना आताही पालिकेचे मोफत पाणी पुरवठा टँकर शहराच्या विविध भागात धावतात. या पाणी पुरवठा टँकर प्रकरणाची चौकशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

Story img Loader