डोंबिवली- येथील पूर्व भागातील आयरे गाव, कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील ४४ एकर जमिनीवरील हरितपट्ट्यात बेकायदा चाळी, बेकायदा १४ इमारती उभारणाऱ्या माफियांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी दिली. आयरे गाव हरितपट्ट्यातील विकास आराखड्यातील रस्ते अडवून, खारफुटी तोडून, प्रस्तावित बाह्य वळण रस्त्याच्या मार्गात बेकायदा चाळी, १४ इमारती उभारण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत सफाई कामगारांकडून आयुक्तांचे आदेश दुर्लक्षित
४४ एकरचा (एक लाख ७५ हजार चौरस फूट) खाडी लगतचा हरितपट्टा माफियांनी बेकायदा बांधकामे करुन हडप केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. बांधकामे करणारे दहशत, दादागिरीचा अवलंब करणारे असल्याने या माफियांच्या मागे सामान्य व्यक्ति, निसर्गप्रेमी नागरिक तक्रारी करण्याच्या भानगडीत पडत नाही. बांधकाम रोखणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना धमकावण्यापर्यत या माफियांची मजल जाते. ‘लोकसत्ता’ने गेल्या दोन महिन्यापासून हरितपट्ट्यावरील बेकायदा बांधकामांविषयी वृत्त देण्यास सुरुवात केल्याने अनेक पर्यावरणप्रेमी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन या बांधकामांच्या तक्रारी करुन ही बांधकामे जमीनदोस्त करण्याची मागणी करू लागले आहेत.
बांधकामे जमीनदोस्त करा
डोंबिवली शहरालगतचा आयरे येथील ४४ एकरचा हिरवागार भूभाग माफियांनी बेकायदा बांधकामे करुन हडप केल्याने या भूभागाची योग्य मोजणी करुन रस्ते, मार्गिका, हरितपट्टा, आरक्षित जमिनींवरील सर्व बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या बांधकामांविषयी अहवाल दाखल करण्याचे आदेश चितळे यांनी दिले आहेत.
नगररचना विभागाचे अभियंता ज्ञानेश्वर आडके यांनी ग प्रभागातील अधिकाऱ्यांना आयरे गाव परिसरातील रस्ते, हरितपट्टा, झालर पट्टी, वळण रस्त्याचा भाग, आरक्षित भूखंड यांच्या हद्दी निश्चित करुन दिल्या आहेत. या हद्दींच्या आतील सर्व बेकायदा बांधकामांना नोटिसा पाठवून ही बेकायदा बांधकामे भूईसपाट करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे, असे साबळे यांनी सांगितले. एकाही बेकायदा बांधकामाला आश्रय दिला जाणार नाही, असे ते म्हणाले.
“आयरे गाव परिसरातील सर्व बेकायदा चाळी, इमारतींना वरिष्ठांच्या आदेशावरुन नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नोटिसीनंतर १४ बेकायदा इमारतींसह रस्ते, आरक्षित जमिनींवर सर्व बांधकामे भुईसपाट केली जाणार आहेत.”
संजय साबळे साहाय्यक आयुक्त ग प्रभाग, डोंबिवली.
“ आयरे परिसरातील बांधकामे तोडा म्हणून अनेक वर्ष आपण पालिकेकडे पाठपुरावा करत होतो. त्या प्रयत्नांना यश आले आहे. बेकायदा इमारतींवर पालिकेने पहिले कारवाई सुरू करावी. कारण तेथे रहिवास होण्याची शक्यता आहे.”
तानाजी केणे – तक्रारदार, आयरे.
“४४ एकरचा आयरे गाव भागातील हरितपट्टा माफियांनी बेकायदा बांधकामे करुन हडप केला तरी पालिका अधिकारी बघ्याची भूमिका घेऊन का बसले. हा विषय ईडी, पोलिसांचे विशेष तपास पथकाच्या निदर्शनास आणणार आहोत. या प्रकरणातील सर्व सहभागी माफिया, पालिका, पोलीस अधिकारी यांच्या चौकशीची मागणी करणार आहोत.”
संदीप पाटील –वास्तुविशारद