ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी देयके भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पाणी पुरवठा विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून यामध्ये गेल्या वर्षभरात ९ हजार ६०३ नळ जोडण्या खंडित करण्याबरोबरच ४११ मोटर पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, ५४७ पंप खोल्यांना टाळे लावण्यात आले आहे. तर, ९ हजार ९२३ थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पाणी विभागाला १०० कोटींचा पाणी देयक वसुलीचा टप्पा ओलांडला आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणी देयकांच्या वसुलीची रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, ७६ कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची देयक रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. एकूण देयकांच्या रकमेपैकी आतापर्यंत १०६ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार पाणी पुरवठा विभागाने पाणी देयकांची थकबाकी भरत नसलेल्या थकबाकीदारांचा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. तसेच, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत आहेत. यामुळे पाणी देयकांच्या वुसलीचा १०० कोटींचा टप्पा पालिकेने ओलांडला असून गेल्यावर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत यंदा १८ कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे, अशी माहिती माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
गेल्या वर्षभरात ९ हजार ६०३ नळ जोडण्या खंडित करण्याबरोबरच ४११ मोटर पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, ५४७ पंप खोल्यांना टाळे लावण्यात आले आहे. तर, ९ हजार ९२३ थकबाकीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पाणी देयकांच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी देयक वसुलीसाठी पाणी पुरवठा विभागाकडून गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाणी देयकांच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर खोल्यांना टाळे लावण्यात येत आहेत. तसेच, पाणी देयकांचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पालिकेने दिला आहे.
कारवाई होणार
प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी देयक वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पाणी बील वसुलीत हयगय करणारे अभियंता आणि लिपिक यांच्यावर शिस्तभंग तसेच वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाईही प्रस्तावित आहे. नागरिकांनी पाणी देयक वेळेत भरावे. तसेच थकबाकीदारांनी देयक भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभाग | वसुली | खंडित नळजोडण्या |
माजिवडा मानपाडा | २१,१२,१३,१३७ | १७६ |
नौपाडा – कोपरी | १३,८३,४६,१०७ | ५२९ |
वर्तकनगर | ११,१६,४६,७९४ | २१९ |
कळवा | १०,९६,८९,७४९ | १३४६ |
उथळसर | ९,०३,८१,६७० | ४३५ |
दिवा | ८,७४,७५,१३९ | १६११ |
लोकमान्य- सावरकर | ७,७२,३४,८६६ | ७३४ |
मुंब्रा | ७,६१,६१,७२६ | ३१३७ |
वागळे | ५,८१,४२,७३० | १४१६ |
मुख्यालय-सीएफसी | ८,०३,९१,३०७ | – |
एकूण | १०६,०६,८३,२२५ | ९६०३ |