डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद एकतानगर भागात एका विकासकाने एकाच नाव साधर्म्याच्या स्वराज रेसिडेन्सी आणि स्वराज प्लाझा अशा दोन इमारती विकसित केल्या. यामधील स्वराज रेसिडेन्सीची जमीन महसूलविषयक कागदपत्रे विकासकाने स्वराज प्लाझा या इमारतीच्या उभारणीसाठी वापरली. ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात स्वराज प्लाझा या बेकायदा इमारतीचे नाव आहे. पण, या इमारतीच्या महारेरा नोंदणी प्रमाणपत्रावर स्वराज रेसिडेन्सी या इमारतीचा सर्व्हे क्रमांक नोंदण्यात आल्याने, ६५ महारेरा बेकायदा इमारत यादीत समाविष्ट नसताना स्वराज रेसिडेन्सी गृहसंकुलाला पालिकेच्या नोटिसा येत असल्याने रहिवासी हैराण आहेत.
याविषयी स्वराज रेसिडेन्सीचे सल्लागार वास्तुविशारद, वकील आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, ई प्रभाग अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केले आहेत. यापूर्वीच्या नोटिसा आणि काही कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्यामुळे या कागदपत्रांमध्ये आम्ही फेरफार करू शकत नाहीत. आणि आपणास पाठविलेल्या नोटिसा आम्ही मागे घेऊ शकत नाहीत, अशी भूमिका कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याने स्वराज रेसिडेन्सीमधील रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
विकासकाने केलेल्या चुकीची शिक्षा रहिवाशांना कशासाठी, असे प्रश्न करत पालिकेने कागदपत्रांची छाननी, सत्यता पडताळून स्वराज रेसिडेन्सीला देण्यात आलेल्या नोटिसा रद्द कराव्यात आणि ६५ महारेरा बेकायदा इमारत यादीतून या गृहसंकुलाचे नाव कमी करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी मात्र महारेरा नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे या नोटिसा तयार करण्यात आल्या आहेत. त्या दुरुस्त करणे, मागे घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. तुम्ही योग्य ठिकाणी न्याय मागा, अशी सूचना रहिवाशांना करत आहेत, असे स्वराज रेसिडेन्सीमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ६५ महारेरा इमारत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याविषयी प्रतिक्रिया देण्यास पालिका अधिकारी तयार नाहीत.
डोंबिवली नांदिवली पंचानंदमध्ये श्री बिल्डर्स डेव्हलपर्सने स्वराज रेसिडेन्सी, स्वराज प्लाझा या दोन इमारतींची उभारणी केली. या दोन्ही इमारतींचे सर्व्हे क्रमांक वेगळे आहेत. विकासकाने स्वराज रेसिडेन्सीचा सर्व्हे क्रमांक हा स्वराज प्लाझाला महारेराचा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी वापरला. त्यामुळे महारेरा नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे स्वराज रेसिडेन्सीचा ६५ महारेरा प्रकरणाशी संबंध नसताना नोटिसा येत आहेत. त्या पालिकेने रद्द कराव्यात. ६५ बेकायदा इमारत यादीतून स्वराज रेसिडेन्सीचे नाव कमी करावे.-सस्मित चिटणीस, वास्तुविशारद.
स्वराज रेसिडेन्सीचा समावेश ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात नाही याची खात्री पालिका अधिकाऱ्यांनी करावी. स्वराज प्लाझा आणि स्वराज रेसिडेन्सी यांची पडताळणी करून ६५ महारेरा यादीतून स्वराज रेसिडेन्सीचे नाव कमी करावे. पालिका अधिकारी याविषयी सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. शासनाने आम्हाला याप्रकरणात न्याय द्यावा.- ॲड. सिताराम चव्हाण, वकील, स्वराज रेसिडेन्सी.
आमच्या सोसायटीत ५४ कुटुंबे राहतात. चुकीच्या पध्दतीने आमच्या इमारतीवर कारवाई केली गेलीतर आम्ही बेघर होऊ. शासन, पालिकेने याप्रकरणात हस्तक्षेप करून आम्हाला न्याय द्यावा- सहदेव सावंत, रहिवासी, स्वराज रेसिडेन्सी.