कल्याण – डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या जलकुंभांजवळील मुख्य वाटेवरील आणि गृह प्रकल्प उभारणी सुरू असलेल्या प्रकल्प जागेतील सात जुनाट झाडे तोडल्याप्रकरणी पालिकेच्या उद्यान विभागाने विघ्नहर्ता पार्कचे आशीष मुंडे यांना सात दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.
पालिकेच्या उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, डोंबिवली विभागाचे अधीक्षक महेश देशपांडे यांनी तीन वेळा गरीबाचापाडा येथील जलकुंभाजवळील मिलेनियम पार्क, श्री गजानन मंदिरांजवळील झाडे तोडल्याच्या ठिकाणची पाहणी केली. जलकुंभांजवळील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यानंतर मुख्य उद्यान अधीक्षक जाधव यांच्या आदेशावरून विघ्नहर्ता पार्कचे आशीष मुंडे यांना झाडे तोडल्याप्रकरणी प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
हेही वाचा >>>ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद
गेल्या आठवड्यात पालिकेच्या उद्यान विभागाकडे एका पर्यावरणप्रेमीने संपर्क करून डोंबिवलीतील गरीबाचापाडा येथील जलकुंभाजवळील मुख्य रस्त्यावरील नारळाची जुनाट तीन झाडे, गुलमोहर, बदाम, आंबा, अन्य एक अशी एकूण सात झाडे यंत्राच्या साहाय्याने बुडासकट तोडून टाकण्यात आली आहेत, अशी तक्रार केली होती. मुख्य अधीक्षक जाधव यांनी अधीक्षक देशपांडे यांना तातडीने घटनास्थळी पाठविले. संबंधित जागेतील झाडे तोडण्यास उद्यान विभागाने कोणालाही परवानगी दिली नसल्याचे निदर्शनास आले.
अधिकाऱ्यांनी जलकुंभाजवळील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात एक टेम्पो तोडलेल्या झाडांची वाहतूक करत असल्याचे दिसले. टेम्पोच्या वाहन क्रमांकावर कोणाला दिसू नये म्हणून माती फासण्यात आली होती. झाडे तोडलेल्या भागात विघ्नहर्ता पार्क विकासकाचा गृहप्रकल्प सुरू आहे. या गृहप्रकल्पाच्या कामासाठी विघ्नहर्ता पार्कच्या विकासकाने ही झाडे तोडली आहेत का, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करून उद्यान विभागाने या गृहप्रकल्पाचे विकासक आशीष मुंडे यांना नोटीस बजावली आहे.विकासकाचा खुलासा पाहून पुढील कारवाई सुरू केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले. पालिकेकडे संशयित म्हणून ज्या ज्या कर्मचाऱ्यांची नावे पुढे आले. त्या सर्वांची जाधव यांनी चौकशी केली आहे.
हेही वाचा >>>ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग कामाचा ठाण्याला ताप; दररोज तीनशे गाड्या माती खणणार
नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी देताना भूमि अभिलेख विभागाने मोजलेल्या नकाशात, विकासकाने दाखल केलेल्या गृहप्रकल्प जागेत किती झाडे आहेत. ते पाहून त्याला झाडे तोडण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेण्यास सांगितले जाते. गरीबाचापाड येथील गृहप्रकल्प जागेत भूमिअभिलेख विभागाने केलेल्या सर्वेक्षणात झाडे दाखवली होती का. ते पाहून ही झाडे कोणी तोडली याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. झाडांचा विषय पूर्ण वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाराखाली आहे, असे नगररचना मधील एका अधिकाऱ्याने सांगितले.
अलीकडे पालिकेच्या परवानग्या न घेता काही जमीन मालक बेकायदा झाडे तोडत असल्याने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. एक झाड तोडल्यानंतर पालिका त्या बदल्यात २५ झाडे लावणे आणि जगविण्याची हमी संबंधितांना घेते.
गरीबाचापाडा येथील झाडे तोडल्याप्रकरणी विघ्नहर्ता पार्कच्या विकासकाला प्राथमिक अंदाजाप्रमाणे नोटीस पाठवली आहे. त्यांच्या खुलाशानंतर योग्य कारवाईचा निर्णय घेतला जाईल.-संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक.
© The Indian Express (P) Ltd