उल्हासनगर शहरातील रस्त्याच्या कडेला, पदपथांवर वर्षानुवर्षे पडून असलेल्या आणि वाहतूक तसेच रहदारीस अडचण निर्माण करणाऱ्या वाहनांना हटवण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने कारवाई सुरू केली असून बुधवारी पालिकेच्या वतीने थेट वाहनांवर नोटीसा चिकटवण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत वाहने न उचलल्यास पालिका प्रशासन ही वाहने जप्त करणार आहे. त्यामुळे आपली वाहने वेळीच हटवण्याची सूचना पालिका प्रशासनाने केली आहे.
हेही वाचा >>>ठाणे: आयुक्त अभिजीत बांगर सुट्टीवर गेल्याने महापालिकेत शुकशुकाट
व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर शहरात लोकसंख्येची घनता मोठी आहे. शहरात लाखो नागरिकांनी दररोज भर पडत असते. ग्राहक व्यापारी मोठ्या संख्येने शहरात येत असतात. अशावेळी शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. त्यात शहरातील रस्ते अरूंद आहेत. अशा रस्त्यांवर विविध ठिकाणी कडेला बेवारस वाहने पडून आहेत. अशा वाहनांनी अनेक पदपथही गिळंकृत केले आहेत. तर अनेक गॅरेज दुकानदारांनी जुनी, नादुरूस्त झालेली वाहनेही आपल्या गॅरेजच्या आसपास ठेवलेली आहेत. त्यामुळे अनेकदा पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडचण निर्माण होते. तर वाहतूक कोंडी सोडवण्यातही अडचणी येत होत्या. यावर तोड़गा काढण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी पालिका मुख्यालयात पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, शहर वाहतूक शाखा आणि पोलिसांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले. यात या बेवारस वाहनांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यावर एकमत झाले होते. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेच्या वतीने बुधवारी शहरातील प्रभाग समिती कार्यालय एक ते चार दरम्यान रस्त्याच्या कडेला, अडचण निर्माण करणाऱ्या बेवारस वाहनांना नोटीस चिकटवली आहे. बुधवारी विशेष मोहिम आयोजित करुन त्यामध्ये बेवारस वाहने शोधून त्यांचेवर इशारा देणारे नोटीसा लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज या नोटीसा चिकटवण्यात आल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. बेवारस वाहनांवर नोटीसचे स्टिकर लाऊन वाहन मालकांना सदरची वाहने हटविण्यासाठी इशारावजा सूचना देण्यात आलेली आहे. विहित मुदतीत त्यांनी बेवारस वाहन न हटविल्यास पालिका आणि पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करुन सदरचे बेवारस वाहन जप्त करण्यात येणार असल्याचेही लेंगरेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>>हल्ल्याला घाबरणार नाही… चोख उत्तर देऊ; ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचा समाजमाध्यमाद्वारे शिंदे गटाला इशारा
गेल्या काही दिवसात पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या मदतीने शहरातील अशा बेवारस आणि रहदारीला अडचण निर्माण करणाऱ्या वाहनांच्या मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता बेवारस वाहनांच्या मालकांना पालिकेने थेट नोटीस दिल्याने येत्या काळात रस्ते, पदपथ मोकळे होण्याची आशा आहे.