कल्याण – महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमधील बेकरी मालकांना प्रदुषणकारी इंधनाऐवजी (लाकूड, कोळसा) जैविक इंधन वापरण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पालिका हद्दीमधील बेकरी चालकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार व परवाना विभागाने कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

या नोटिसा मिळाल्यानंतरही बेकरी मालकांनी लाकूड, कोळसा या व्यावसायिक प्रदुषणकारी इंधनाऐवजी नैसर्गिक वायू गॅस (एलपीजी), विद्युत साधनांचा वापर बेकरीमध्ये उर्जेसाठी केला नाहीतर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय बाजार व परवाना विभागाने घेतला आहे. या नोटिसांमुळे अनेक वर्ष बेकरीमध्ये व्यावसायिक इंधन वापरणाऱ्या बेकरी चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पालिका हद्दीतील अनेक हाॅटेल्स, उपहारगृहे, ढाबे, बेकरी, तंदुर हाॅटेल्स पदार्थ तयार करण्यासाठी, भट्टीमधील जळणासाठी लाकूड, कोळशाचा प्रभावी वापर करतात. हे दोन्ही घटक जळल्यानंतर धूर तयार होतो. हा धूर नियंत्रणासाठी कोणतीही यंत्रणा आस्थापनांमध्ये नसते. त्यामुळे या आस्थापना शहर परिसरात प्रदूषण करत असल्याचे बाजार व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. बाजार व परवाना विभागाने या विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण परिसरात केलेल्या सर्वेक्षणात गरीब नवाझ, मदिना, हुसेन, सागर हे बेकरी चालक जैविक इंधनाऐवजी लाकुड आणि कोळशाचा वापर करत असल्याचे पाहणीत आढळले. विहार, फाईनडाईन हाॅटेलांमध्ये तंदुर तयार करताना कोळशाचा वापर केला जात होता. डोंबिवलीतील रुबीना, श्रीकृष्ण बेकरी चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.हे बेकरी चालक महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाचा परवाना न घेता बेकायदा हा व्यवसाय करत आहेत.

हेही वाचा >>>कल्याणमधील आईच्या सहमतीने मित्राकडून मुलीवर उत्तराखंडमध्ये लैंगिक अत्याचार

यापूर्वीच्या बाजार व परवाना विभागातील अधिकारी बेकरी चालकांशी संधान साधून या बेकरी चालकांना अभय द्यायचे, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे वर्षानुवर्ष पालिका हद्दीतील बेकरी चालक कोळसा, लाकडाचा वापर इंधनासाठी करत आहेत. बाजार व परवाना विभागाचा पदभार प्रसाद ठाकुर यांनी स्वीकारल्यापासून त्यांनी बेकायदा मटण, मांस विक्री, उघड्यावरील बेकायदा बाजार, प्रदुषणकारी बेकरी चालकांवर कारवाई सुरू केली आहे. अनेक वर्ष बेकायदा व्यवसाय करणाऱ्या या चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कडोंमपा हद्दीतील बेकरी चालकांनी येत्या २० दिवसात बेकरीत जैविक इंधनाचा वापर सुरू करावा. अन्यथा, अशा आस्थापनांवर आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून कायदेशीर, तसेच या आस्थापना सील करण्याची कारवाई सुरू केली जाईल.-प्रसाद ठाकुर,साहाय्यक आयुक्त,बाजार व परवाना विभाग.