कल्याण: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात लालचौकी रिक्षा वाहनतळावर भाडे नाकारणाऱ्या दोन बेशिस्त रिक्षा चालकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा मिळाल्यानंतर तातडीने कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी काढले आहेत.

या कारवाईमळे रिक्षा चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळ लाल चौकीकडे जाण्यासाठी वाहनतळ आहे. लालचौकी परिसरात महाविद्यालये, शाळा, खासगी कार्यालये, रुग्णालये, आधारवाडी तुरुंग आहे. कसारा, मुंबई भागातून येणारा बहुतांशी नोकरदार वर्ग लालचौकी रिक्षेने इच्छित स्थळी जातो. मागील काही महिन्यांपासून लालचौकी वाहनतळावरील रिक्षा चालकांना आधारवाडी येथील श्री काॅम्पलेक्स संकुल येथे जाण्यासाठी प्रवासी ६० ते ७० रुपये भाडे देतात. लालचौकी रिक्षा थांब्याच्या पुढील टप्प्यात श्री काॅम्पलेक्स संकुल आहे. वाढीव भाडे मिळत असल्याने रिक्षा चालक लालचौकी भाडे घेण्याऐवजी श्री काॅम्पलेक्स भाडे घेण्याला सर्वाधिक पसंती देत आहेत.

हेही वाचा >>> पलावा चौकातील रखडलेल्या पुलासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका? चार वर्षापासून रखडला आहे उड्डाण पूल

रिक्षा चालकांकडून सुरू असलेल्या या प्रकाराविषयी रिक्षा संघटना कठोर भूमिका घेत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. कोणी प्रवाशाने लालचौकी येथील भाडे घ्या, असा आग्रह केला तर संघटित होऊन रिक्षा चालक त्या प्रवाशाला लक्ष्य करत होते. लालचौकी येथे जाण्यासाठी दोन प्रवासी रिक्षेत बसले आहेत. त्याचवेळी श्री काॅम्पलेक्स येथे जाणारे तीन प्रवासी एकत्रित आले तर रिक्षा चालक लालचौकीच्या रिक्षा चालकांना जबरदस्तीने रिक्षेतून उतरवुन श्री काॅम्पलेक्स भाडे घेण्याला प्राधान्य देत आहे. याविषयी प्रवाशाने आवाज केला तर अरेरावीच्या भाषेत रिक्षा चालक आमची तक्रार आरटीओ, वाहतूक विभागाकडे करा, आम्हाला काहीही होणार नाही, अशी भाषा करत आहेत.

हेही वाचा >>> पलावा चौक येथे महिला रिक्षातून पडून गंभीर जखमी, रिक्षा चालकाचा निष्काळजीपणा

शनिवारी असाच प्रकार लालचौकी भागातील महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत घडला. महिला शिक्षिका लालचौकीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ रिक्षेत (एमएच-०५-डीझेड-७१०६, एमएच-०५-झेड-७२८०) बसल्या होत्या. त्याचवेळी श्री काॅम्पलेक्स येथे जाण्यासाठी तीन प्रवासी आले. रिक्षा चालकाने तात्काळ लालचौकी भागात जाणाऱ्या महिला शिक्षिकांना रिक्षेतून खाली उतरवले. आम्हील उतरणार नाही, अशी भूमिका शिक्षिकांनी घेतली. त्यावेळी जबरदस्तीने चालकाने प्रवाशांना खाली उतरविले. दुसऱ्या चालकाने ही भाडे नाकरले.

हेही वाचा >>> कल्याण: अपघातानंतर पडघा-खडवली बस सेवा सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकाराची तातडीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांच्याकडे शिक्षिकांनी तक्रार केली. साळवी यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन दोन्ही रिक्षा चालकांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. लालचौकी वाहनतळावरील रिक्षा चालकांवर कारवाई झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. “लालचौकी रिक्षा वाहनतळावर प्रवासी भाडे नाकारणाऱ्या दोन रिक्षा चालकांना तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षा वाहनतळावर जवळ आरटीओचा तक्रार क्रमांक फलकावर लावण्यात येणार आहे. प्रवाशांनी भाडे नाकारणाऱ्या चालकाची तक्रार करण्याचे आवाहन केले जाणार आहे.” -विनोद साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण.