लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या सफाई कामगारांना सामान्य प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत. येत्या तीन दिवसात संबंधित साहाय्यक आयुक्त, सफाई कामगारांनी समाधानकारक खुलासे न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिला आहे.

गेल्या वीस दिवसापूर्वी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी विविध प्रभागांमध्ये फेरीवाला हटाव पथकात काम करणाऱ्या सफाई कामगारांना मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले. कल्याण पश्चिमेतील क प्रभागातील संतोष भिमा जाधव, सुहास कांबळे, कांतिलाल अहिर, संभाजी म्हात्रे, विजय पादारे, दिनेश परमार, अनिल दोंदे कामगार वीस दिवस होऊनही घनकचरा विभागात हजर झाले नाहीत.

क प्रभागाचे साहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनीही या कामगारांना प्रभागातून मुक्त करण्याची कार्यवाही केली नाही. आयुक्तांनी आदेश देऊनही क प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील सफाई कामगार बदली आदेश निघूनही क प्रभागात कार्यरत असल्याची माहिती मिळताच सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी क प्रभागाचे सोनावणे, इतर सात कामगारांना मूळ विभागात का हजर झाले नाहीत म्हणून कारणे दाखवा नोटिसा काढल्या. सोनावणे यांनी या कामगारांना तात्काळ मुक्त करणे गरजेचे होते.

आणखी वाचा- ठाणे पालिकेच्या लघुलेखकांच्या वेतनश्रेणीत वाढ, शासनाप्रमाणे वेतनश्रेणी लागू

कर्तव्यात दिरंगाई केली म्हणून उपायुक्त दिवे यांनी सोनावणे, आयुक्तांचा आदेश डावलल्याने कामगारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. फ प्रभागातील सफाई कामगार अरुण जगताप हेही बदली आदेशानंतर १५ दिवस मूळ विभागात हजर झाले नाहीत. त्यांना नोटीस न काढल्याने प्रशासनात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वर्षानुवर्ष ३०० हून अधिक सफाई कामगार मुख्यालय, प्रभागात शिपाई, फेरीवाला हटाव पथकात, कर विभागात काम करतात. रस्त्यावर सफाई करण्यासाठी कामगार उपलब्ध होत नव्हते. आयुक्त दांगडे यांनी अशा कामगारांना घनकचरा विभागात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत १५० हून अधिक कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा- कल्याण पूर्वेतील काटेमानिवली-तिसगाव यु टाईप रस्त्याच्या रुंदीकरण प्रक्रियेला प्रारंभ

जगताप यांची बदली

डोंबिवलीत फ प्रभागात फेरीवाल्यांची पाठराखण करणारा सफाई कामगार अरुण जगताप यांची आयुक्तांनी अ प्रभागात टिटवाळा जवळील बल्याणी येथील हजेरी निवाऱ्यावर बदली केली आहे. फ प्रभागात जगताप यांच्यामुळे फेरीवाले रस्त्यावर बसतात हा विषय अनेक महिने ‘लोकसत्ता’ने लावून धरला होता. त्याची दखल आयुक्तांनी घेतली.

कामगाराला मारहाण

ग प्रभागात फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही. तेथील कामगार फेरीवाल्यांकडून हप्ते खातात. हे दाखविण्यासाठी फ प्रभागातील एका वाद्ग्रस्त कामगाराने बनाव रचला. त्याने एका कलिंगड विक्रेत्याला ग प्रभागातील एका कामगाराला ५० रुपये देऊन त्याची दृश्यचित्रफित काढण्यास सांगितले. ग प्रभागातील कामगार आमच्याकडून कसे हप्ते खातात, ही दृश्यचित्रफित प्रसारित करण्यास सांगितले. हा प्रकार ग प्रभागातील एका सरळमार्गी कामगाराला समजताच त्याने फ प्रभागातील संबंधित कामगाराला बोलावून चांगला ‘प्रसाद’ दिला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notices to sweepers not appearing at the place of transfer in kalyan mrj
Show comments