बोरिवली, येऊरमधील पाणवठय़ावरील गणनेतील आकडेवारी
बुद्धपौर्णिमेच्या दिवशी केलेल्या प्राणिगणनेत मुंबई, ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाणवठय़ावर एकूण ४६६ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्राणिगणनेत १५ बिबटे, ४५ चितळ आणि १२८ माकडांचे वास्तव्य जंगलस्थळी आढळले आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या जंगलातील बिबळ्यांचे वास्तव्य अगदी ठसठशीतपणे दिसून आले आहे. इतर वन्यप्राण्यांच्या तुलनेत माकड आणि वानर या प्राण्यांचे सर्वाधिक अस्तित्व या ठिकाणी सर्वाधिक आढळले आहे.
येऊर आणि बोरिवली परिसरातील तुळशी वनक्षेत्र येथे जंगलस्थळी रात्रीच्या वेळी उपस्थित राहून प्राण्यांची गणना करण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी, पर्यावरण संस्थांचे प्रतिनिधी तसेच सामान्य नागरिक यांच्या सहभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची यंदाची प्राणिगणना पार पडली. येऊर येथे तीन बिबटे आणि तुळशी वनक्षेत्र परिसरातील शिलोंडा ट्रेल, कान्हेरी गेट येथे प्रत्येकी एक, भूतबंगला नवी मोरी येथे चार तसेच कान्हेरी गेट ते विहार गेट येथे तीन, वाघेश्वरी गेटदरम्यान तीन बिबटे वन कर्मचाऱ्यांना आढळून आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर प्राण्यांच्या विहारासाठी मोठा आहे. बिबटय़ांना खाद्यासाठी लागणारे श्वान, मांजर, ससे असे प्राणी जंगलात आणि जंगलाबाहेर उपलब्ध होतात. त्यामुळे उद्यान परिसरात बिबटे मोठय़ा प्रमाणात हजेरी लावतात, असे वाइल्ड लाइफ कन्झर्वेशन सोसायटीचे निकेश सुर्वे यांनी सांगितले.
बदलापूरच्या जंगलातही वावर..३
येऊरच्या जंगलात मुबलक प्रमाणात आढळणारी हसोळी, धामण, कुंभी, घटबोर, उंबर, पापडी, टेंबुर्णी, आवळा, बोरसाळ, चिरणी, मोह अशी फळांची झाडे अस्तित्वात आहेत. माकडांना आहारासाठी फळे जास्त प्रमाणात आढळतात. गेल्या काही वर्षांत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फळझाडांमध्ये वाढ झाली असल्याने माकडांना हा परिसर पोषक ठरतो.
उदय ढगे, साहाय्यक वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान