कल्याण – कल्याण जवळील आंबिवलीतील इराणी वस्तीमधील पाटीलनगर भागात राहत असलेल्या कुख्यात गुन्हेगार सोनसाखळी चोर जाफर गुलाम इराणी (२७) बुधवारी चेन्नई येथे १० किलो सोन्याची चोरून करून आपल्या दोन साथीदारांसह विमानाने हैदराबाद येथे पळून जात होता. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत तो ठार झाला. त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जाफर इराणी हा आंतरराज्य टोळीतील कुख्यात गु्न्हेगार होता. राज्याच्या विविध भागातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. महाराष्ट्रातील पोलिसांना तो सतत गुंगारा देत होता. एका राज्यात चोरी केल्यानंतर तेथून विमानाने घरी परतायचे अशी त्याची चोरीची पध्दत होती. त्यामुळे चोरी केल्यानंतर तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता.

कल्याण, ठाणे, मुंबई, वसई, विरार, नवी मुंबई परिसरात जाफर इराणी आणि त्याच्या टोळीचा सर्वाधिक वावर होता. अनेक वेळा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. तो पोलिसांची नजर चुकवून पळून जात होता. चेन्नई येथे काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. गळ्यात सोन्याचा ऐवज असणाऱ्या पादचाऱ्यांना लुटले जात होते. चेन्नईतील बसंतनगर, गिंडी, वेलाचेरी, तांबरम अशा अनेक पोलीस ठाण्यांमध्ये २५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. अचानक चेन्नईत चोऱ्या वाढल्याने चेन्नई पोलीस हैराण होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये तीन इसम या चोऱ्या करत असल्याचे निदर्शनास आले होते.

या माहितीच्या आधारे चेन्नई पोलिसांनी विशेष तपास पथके गुन्हेगारांना पकडण्यासाठी स्थापन केली होती. हा तपास सुरू असताना चेन्नई विमानतळावर काही संशयित हैदराबादला जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती चेन्नई पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने विमानतळाला वेढा घालून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १० किलो सोने आढळून आले. पोलिसांनी त्यांना विमानतळावरून पोलीस ठाण्याच्या दिशेने घेऊन येत असताना जाफर आणि साथीदार पोलिसांना हिसका देऊन पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांबरोबरच्या चकमकीत जाफर ठार झाला. त्याचे साथीदार सलमान मेश्राम, अमजद इराणी जखमी झाले आहेत.

जाफरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय चेन्नईला रवाना झाले आहेत. जाफर ठार झाल्याचे समजताच आंबिवली इराणी वस्ती भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. इराणी वस्ती गुन्हेगारांचा अड्डा म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. विविध भागात चोऱ्या करून चोरटे या वस्तीत येऊन लपून बसतात. पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले की या वस्तीमधील महिला पुढाकार घेऊन पोलिसांवर दगडफेक करून परतून लावतात, असे प्रकार नियमित येथे घडतात. काही वर्षापूर्वी यात वस्तीमधील कुख्यात कलंदर इराणी, त्याचा मुलगा कंबर पोलिसांच्या बरोबरच्या चकमकीत ठार झाले होते. जाफरच्या मृत्युने विविध राज्यातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.