कुख्यात गुंड रवि पुजारी याचा हस्तक विजय साळवी उर्फ विजय तांबट याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. २०१७ मध्ये एका बांधकाम व्यवसायिकाकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी विजय साळवी विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनिमय (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा >>> आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांच्या एकत्रित सुनावणीवर नार्वेकरांचा महत्त्वाचा निर्णय
कुख्यात गुंड रवि पुजारीच्या टोळीतील गुंडांनी २०१७ मध्ये रोमा बिल्डर्स या कंपनीच्या महेंद्र पमनानी यांच्याकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. काही दिवसांनी रवि पुजारीच्या दोन हस्तकांनी बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयात शिरून गोळीबार केला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली होती. तर विजय साळवी हा आरोपी फरार झाला होता. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ‘लुक आऊट नोटीस’ काढली होती. विजय हा संयुक्त अरब अमिरातमधून गुरुवारी विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला असता, तेथील प्राधिकरणाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.